Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी ६ जून पासून धरणे आंदोलन करणार



गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर-बांदा महामार्ग 548 या रस्त्याचे रुंदीकरण व मजबूती करण्यास लागणाऱ्या जमिनीचे रीतसर भूसंपादन करून मोबदला मिळावा या मागणीसाठी दिनांक ६ जून पासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे. 




या निवेदनात म्हटले आहे की,  संकेश्वर- बांदा महामार्ग 548 या रस्त्याचे रुंदीकरण व मजबूती करणास लागणाऱ्या जमिनीचे रीतसर भूसंपादन करून मोबदला मिळावा यासाठी अनेक आंदोलने मोर्चे, धरणे, बैठका झाल्या मात्र कोणत्याही बैठकीचे इतिवृत्त संघटनेला मिळालेले नाही. ज्या ज्या बैठका झाल्या आहेत त्या बैठकीचे इतिवृत्तांत ताबडतोब संघटनेला मिळावे.

       


सार्वजनिक बांधकाम विभागाकडील वापरातील रस्ता असताना 2004 साली वापरात असणाऱ्या रस्त्याची लांबी रुंदीची माहिती अधिकार कायदा अर्जाद्वारे मिळालेली आहे. त्यामध्ये साडेपाच मीटर रुंदीचा रस्ता ताब्यात असल्याचे कळविले आहे. म्हणजे साडेसोळा फूट किंवा 18 फूट रुंदीचा रस्ता सार्वजनिक बांधकामच्या  ताब्यात आहे. असे असताना देखील मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेतात रस्ता रुंदीकरणासह काँक्रिटीकरण, मोरी बांधणे, गटारी बांधणे अशी कामे केली जात आहेत. मात्र बाधित शेतकऱ्यांना जमीन संपादनाची नोटीस दिली नाही,  अगर कोणत्याही शेतकऱ्याला मोबदला दिलेला नाही. कोणत्या दराने मोबदला देणार याबाबत देखील लेखी अगर तोंडी माहिती दिलेली नाही. 

      


रस्त्याचे काम बेकायदेशीर चालू आहे. महामार्ग बनवणाऱ्या कंपनीसह राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक दोनचे अधिकारी अधिकाराचा गैरवापर करून शेतकऱ्यांची जमीन लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकरी महामार्ग करण्यासाठी विरोधात नाहीत मात्र ज्यांच्या त्यांच्या हक्काची जमीन सातबारा पत्रकी आहे त्यांचे मोजमाप करून रीतसर संपादन करावे व कायद्याप्रमाणे मोबदला मिळावा हीच त्यांची अपेक्षा आहे. या महामार्गावर टोल बसणार असल्याचेही बैठकीच्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, याचा अर्थ शेती फुकट घ्यायची व टोल चालवणाऱ्या कंपनीचा फायदा करायचा हा डाव दिसून येतो. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी योग्य न्याय देण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नियोजन करावे. सदरची बैठक येत्या दहा दिवसात घ्यावी अन्यथा  शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी दिनांक ६ जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  दारात धरणे आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

     


या निवेदनावर कॉम्रेड शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे, आनंद येसणे, मारुती इंगळे, शंकर मोरबाळे, गणपती येसणे, शिवाजी कुंभार, अनिल शिंदे, विठ्ठल शिंदे, हरिराम चव्हाण, दत्तात्रय कदम यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.



दरम्यान, या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी आजरा-भुदरगड, गडहिंग्लज, उप अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक दोन कोल्हापूर, पोलीस निरीक्षक आजरा, गडहिंग्लज यांना देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.