Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत गप्प बसणार नाही

गडहिंग्लज मधील सर्वपक्षीय बैठकीत निर्णय


दोषींचे वकीलपत्र न स्वीकारण्याची वकील संघटनेकडे करणार मागणी 


मुख्यमंत्री, पालकमंत्री यांचीही भेट घेणार   




गडहिंग्लज (प्रतिनिधी):  युवा उद्योजक संतोष शिंदे, त्यांची पत्नी व मुलाच्या आत्महत्या प्रकरणातील 'त्या' दोषींवर कठोरातील कठोर कारवाई होईपर्यंत गप्प न बसण्याचा निर्णय गडहिंग्लज येथे झालेल्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, या दोषींचे वकीलपत्र घेण्यात येऊ नये अशी मागणी गडहिंग्लज बार असोसिएशनकडे करणार असल्याचे सांगण्यात आले.




गडहिंग्लज येथील अर्जुन उद्योगसमूहाचे प्रमुख व युवा उद्योजक संतोष शिंदे यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवल्याच्या तणावातून व खंडणीच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी रात्री पत्नी व मुलासह राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये उद्योजक संतोष व त्यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी आत्महत्येचे कारण स्पष्ट करत आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या एका माजी नगरसेविकेसह एक पोलीस अधिकारी व अन्य दोघांची नावे लिहिल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज मधील सर्वपक्षीय कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. एका युवा उद्योजकाला खोट्या गुन्ह्यात अडकवून खंडणी उकळण्याचा झालेला प्रयत्न यामुळे आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. त्यांना दिलेल्या त्रासामुळे उद्योजक संतोष यांचे कुटुंबच उध्वस्त झाले. याला जबाबदार असणाऱ्या त्या चौघांवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी यासाठी आज सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.



या बैठकीत आत्महत्या प्रकरणातील दोषींचे वकीलपत्र घेण्यात येऊ नये अशी मागणी गडहिंग्लजच्या वकील संघटनेकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोषींवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत विविध आंदोलनाच्या माध्यमातून लढा देण्याचा निर्धार करण्यात आला. या संदर्भात मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचीही भेट घेऊन याकडे त्यांचेही लक्ष वेधण्याचे ठरविण्यात आले.




या बैठकीला महेश उर्फ बंटी कोरी, किरणराव कदम, सिद्धार्थ बन्ने, राजेश बोरगावे, बसवराज खणगावे, वसंतराव यमगेकर, महेश सलवादे, रमेश रिंगणे, रामगोंडा पाटील, सौ. स्वाती कोरी  आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.