आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांची माहिती
सकाळी सात ते रात्री सात पर्यंत विद्यार्थ्यांना पास देणार
![]() |
| गडहिंग्लज : विद्यार्थिनींना अहिल्यादेवी होळकर मोफत पास वाटप करताना आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे, सोबत प्राचार्य विजयकुमार चौगुले, मोहन पोवार, अमोल पाटील यांच्यासह अन्य. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. विद्यार्थ्यांची एसटीचा पास मिळवण्यासाठी धडपड सुरू असते. बऱ्याच वेळा बस स्थानकातील कार्यालयात तासंतास रांगेत उभे राहावे लागते. विद्यार्थ्यांची दरवर्षी होणारी ही गैरसोय दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात पास देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन गडहिंग्लज आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांनी केले आहे. सकाळी सात ते रात्री सात पर्यंत विद्यार्थ्यांना पास देण्याचा निर्णय घेतला आहे.
जागृती प्रशालेत अहिल्यादेवी होळकर मुलींसाठी मोफत योजनेअंतर्गत शालेय पास वितरण प्रसंगी श्री. रणे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य विजयकुमार चौगुले होते.यावेळी स्थानक प्रमुख मोहन पोवार,आगार लेखाकार अनिल पाटील,वरिष्ठ लिपिक अजित अकोळकर, वाहतूक नियंत्रक चंद्रकांत कोष्टी उपस्थित होते.
आगार व्यवस्थापक रणे पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी गडहिंग्लजला विविध अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी एसटीने प्रवास करतात. शैक्षणिक वर्ष सुरू होताच एसटीचा सवलत पास मिळवण्यासाठी धावपळ सुरू होते. शाळेचे तास बुडवून विद्यार्थी बस स्थानकात थांबून असतात. त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गडहिंग्लज आगाराने सकाळी सात ते रात्री सात पर्यंत विद्यार्थ्यांना पास देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यावेळी त्यांनी राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या सवलती, मुलीसांठी अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजना, विद्यार्थ्यांना ६७ टक्के सवलत, महिला सन्मान योजना, त्रैमासिक पास योजना यांची माहिती दिली.
सूत्रसंचालन सुहास पुजारी यांनी केले. आभार पर्यवेक्षक एस.बी. आनावरे यांनी मानले. यावेळी प्रशालेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


