गडहिंग्लज येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांची पत्नी व मुलासह आत्महत्या
सुसाईड नोटमध्ये आत्महत्येस प्रवृत्ती केलेल्या व्यक्तींची नावे असल्याची चर्चा
गडहिंग्लज शहरासह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ
खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या 'त्या' दोघांवर कारवाईची नागरिकांची मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): पश्चिम महाराष्ट्रासह कोकण व कर्नाटकात मोठा उद्योग विस्तार असणाऱ्या गडहिंग्लज येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख व युवा उद्योजक संतोष वसंत शिंदे (वय ४४) यांनी पत्नी तेजस्विनी ( वय ३६) व मुलगा अर्जुन ( वय १४) यांनी आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून व गळा चिरून घेत आत्महत्या केल्याने गडहिंग्लज शहरासह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी पती-पत्नीने आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या व्यक्तींची नावे चिठ्ठीत लिहिल्याचे बोलले जाते. मृतदेहाजवळ सापडलेल्या या चिठ्ठीत नेमके काय लिहिले आहे? याबाबत पोलिसांनीही अद्याप माहिती दिलेली नसून अधिकृत माहिती दिल्यानंतरच याबाबत उलगडा होणार आहे. हजारो हाताना रोजगार देऊन त्यांचे कुटुंब उभे करणाऱ्या एका युवा उद्योजकाचा झालेला शेवट हा संपूर्ण गडहिंग्लजकरांसह महाराष्ट्रालाही सुन्न करणारा आहे. खोट्या गुन्ह्यात अडकविल्याच्या तणावातून उद्योजक संतोष शिंदे यांनी उचललेले हे टोकाचे पाऊल सर्वांनाच डोळ्यात पाणी आणणारे असून हळहळ व्यक्त होत आहे. एक उमद्या युवा उद्योजकाला गडहिंग्लज तालुक्याने गमावल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, उद्योजक संतोष शिंदे गडहिंग्लज मधील गांधीनगर येथे राहत होते. महिन्याभरापूर्वी संतोष यांना एका महिलेने बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविले होते. या प्रकरणात त्यांना कारवाईलाही सामोरे जावे लागले होते. त्यामुळे काही दिवसापासून ते ताण तणावात होते. त्याचबरोबर उद्योगातही काही दिवसापासून चढ-उतार येत असल्याने ते अस्वस्थ होते. या मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले. शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंतर बेडरूममध्ये पत्नी तेजस्विनी, मुलगा अर्जुन यांचा गळा चिरून हत्या केली त्यानंतर संतोष यांनी औषध प्राशन करत स्वतःचाही गळा चिरून घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शनिवारी सकाळी संतोष यांच्या बेडरूमचा दरवाजा उघडलेला न दिसल्याने त्यांच्या आईने याबाबतची कल्पना शेजाऱ्यांना दिली. खिडकीतून डोकावल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळल्याने सर्वांनाच धक्का बसला. घरातील दृश्य हे हृदयद्रावक होते. तिन्हीही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेची माहिती मिळताच गडहिंग्लज शहरासह तालुक्यातील नागरिकांनी संतोष शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली होती. एका युवा उद्योजकाने पत्नी मुलासह आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, पोलीस निरीक्षक गजानन सरगर, उपनिरीक्षक विक्रम वडणे घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्यानंतर मृतदेह ताब्यात घेत कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयाकडे पाठविण्यात आले. या दाम्पत्याने आपल्या मुलासह नेमकी कशी आत्महत्या केली याचा उलगडा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच होणार आहे.
सुसाईड नोटमध्ये 'त्या' दोघांची नावे?
उद्योजक संतोष शिंदे व त्यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे आढळले. सदर सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे कारण लिहिल्याचे बोलले जाते. आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या 'त्या' दोघा व्यक्तींची नावेदेखील लिहिल्याची चर्चा आहे. ही सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे मात्र सुसाईड नोटमध्ये नेमके काय लिहिले आहे याची माहिती मात्र पोलिसांनी गोपनीय ठेवले आहे. चिठ्ठीतील माहिती मिळाल्यानंतरच त्या चिठ्ठीत नेमके काय लिहिले आहे याचा उलगडा होणार आहे.
दोषींवर कारवाई करा, मगच मृतदेह हलवा!
उद्योजक संतोष शिंदे यांनी पत्नी व मुलासह आत्महत्या केल्याची माहिती मिळताच गडहिंग्लज मधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी संतोष शिंदे यांच्या निवासस्थानी धाव घेतली. उद्योजक संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या 'त्या' दोघांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेहांना हात लावू देणार नाही असा पवित्रा महेश उर्फ बंटी कोरी, संतोष चिकोडे, नागेश चौगुले, महेश सलवादे यांच्यासह इतर पदाधिकारी व नागरिकांनी घेतला. पोलिसांनी चर्चा केल्यानंतर अखेर मृतदेह हलविण्यात आले.
गडहिंग्लज शहरातील व्यवहार बंद ठेवत श्रद्धांजली
उद्योग क्षेत्रात 'अर्जुन'चा नावलौकिक
उद्योजक संतोष शिंदे यांनी अर्जुन उद्योग समूहाच्या माध्यमातून खाद्यतेलाचे उत्पादन करत होते. खाद्यतेलातील 'अर्जुन' हे ब्रँड कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, कोकण व कर्नाटकात देखील प्रसिद्ध आहे. त्या पाठोपाठच विराज फूड्स नावाने बेकरी उत्पादनही त्यांनी सुरू केले होते. कमी वयात अल्पावधीतच अर्जुन उद्योग समूहाचा मोठा डोलारा त्यांनी उभा करत उद्योग क्षेत्रात गडहिंग्लजचे नावलौकिक केले होते. त्यांच्या उद्योगाचा विस्तार हा मुंबई, कोकणसह कर्नाटकात देखील होता. या माध्यमातून बऱ्याच युवकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. संतोष शिंदे यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे.




