ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख महिंद्र पंडित यांना निवेदन
सीमाभागात गांजा विरोधी स्वतंत्र पथक स्थापन करण्याची मागणी
![]() |
| कोल्हापूर : जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना निवेदन देताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, गडहिंग्लज शहर प्रमुख संतोष चिकोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक. |
कोल्हापूर (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यात हेब्बाळ येथे कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून गांजाची शेती नष्ट केली असली तरी तालुक्यातील अन्य ठिकाणांचाही शोध घेऊन गांजा खरेदी-विक्रीची पाळेमुळेच खोदून काढण्याची गरज आहे. यासाठी सीमाभागात गांजा विरोधी स्वतंत्र पथक स्थापन करावे अशी मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज तालुक्यामध्ये हेब्बाळ येथे गांजाची शेती करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करुन तब्बल ७ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून ७ ते ८ फूटांची ७५ झाडे पोलिसांनी जप्त केली आहेत. ही झाडे इतकी मोठी होईपर्यंत स्थानिक यंत्रणेला कोणतीही माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या चार-पाच वर्षापासून गडहिंग्लज हे गांजा विक्रीचे केंद्रच बनले असून, आता उत्पादकही बनल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी गेल्या चार वर्षात अनेकदा गांजा विक्रीविरोधात कारवाई झाली आहे. मात्र याची पाळेमुळे शोधून कारवाईची गरज बनली आहे.
कर्नाटक व गोव्यातील गांजा खरेदी-विक्री करणारी मंडळी गडहिंग्लजला मध्यवर्ती केंद्र मानून या ठिकाणी हात-पाय पसरवत असल्याने गडहिंग्लज गांजा विक्री केंद्र झाले आहे. गांजाशी संबंधित लोकांची उठबसही निर्जनस्थळी वाढली असून पोलिसांनी आता या स्थळांचा शोध घेऊन गांजा विक्रीची पाळेमुळे खोदून काढण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षापासून गडहिंग्लजमध्ये गांजाचा धूर निघत असून सुरुवातीला नशा करणारी ही युवक मंडळी कर्नाटकातून गांजा आणून गडहिंग्लजमध्ये निर्जन ठिकाणांमध्ये गांजाचा धूर काढत होती. गांजा ओढणाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर गांजा पुरवठादार तयार झाले असून यातून गडहिंग्लजमध्ये सुरुवातीला काहीशा ग्रॅममध्ये येणारा गांजा आता किलोमध्ये येऊ लागला आहे. कर्नाटक परिसरातून मोठ्या प्रमाणात गांजा येऊ लागल्याने त्याची विक्रीही याच ठिकाणाहून होत असल्याचे दिसून येत आहे. आता तर थेट गांजाचे उत्पादनच गडहिंग्लजला केले जात आहे.
गोव्यात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असून त्यासाठी यातील काही एजंट गडहिंग्लजमधील विक्रेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होऊ लागली आहे.
गडहिंग्लज तालुका व सीमा भागावर गांजा विरोधी स्वतंत्र पथक स्थापन करावे, गडहिंग्लज तालुका गांजा पिकवणी व विक्री केंद्र करणाऱ्यांवर नशीले पदार्थ कायदा तसेच 'मोका अंतर्गतही कारवाई करावी, कर्नाटकातून गडहिंग्ल जला गांजा मोठ्या प्रमाणात येतो. ती रोखण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सिमेवर तपासणी नाके बसवावेत. आदी मागण्या या निवेदनातून शिवसेनेने केल्या आहेत.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख संतोष चिकोडे, संदीप कुराडे, रवींद्र पाटील, बाळू कुंभार, सुनील डवरी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.



