गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात हंदेवाडी (ता.आजरा) येथील निखील शंकर कदम यांची एन.डी.ए.परीक्षेतून लेफ्टनंटपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे व प्राचार्य डॉ. एस.एम. कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डॉ.आनंदा कुंभार यांनी केले. या कार्यक्रमात लेफ्टनंट निखील कदम यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आज तरुणांना भारतीय सैन्यदलात ऑफिसर होण्यासाठी खूप संधी आहेत. एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांना देखील सैन्य दलात अधिकारी पदावर काम करण्याची संधी आहे. ही संधी मिळविण्यासाठी आपण जिद्दीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. सैन्य दलातून देशसेवा करण्याची संधी मिळते. सैन्य दलातील नोकरी प्रतिष्ठा देणारी आहे. देशसेवेच्या संधीतून खरा सन्मान मिळतो असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपण कसे घडलो हा प्रवास सांगून सैन्य दलात सेवा करण्याची संधी आजच्या तरुणांनी दवडू नये. या सेवेतून एकप्रकारचा सन्मान मिळतो शिवाय आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेतली जाते असे त्यांनी सांगितले. शिवाय सैन्य दलामध्ये संधी प्राप्त करण्यासाठी कोण-कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी निखील कदम यांनी एन.डी.ए.सारखी खडतर अशी परीक्षा देऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. भारतीय सैन्य दलाच्या पवित्र क्षेत्रामध्ये निखील यांना सेवा करण्याची संधी मिळाली आहे. हे खरोखरच अभिमानस्पद असल्याचे सांगून आजच्या विद्यार्थ्यांनी निखिल कदम यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे असे सांगितले. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी निखिलच्या प्रेरणादायी कार्याला आई-वडील यांचे नेहमीच पाठबळ मिळाले आहे. निखिलने ते यशस्वीपणे करून दाखविले आहे. त्याच्या या प्रेरणादायी कार्यातून विद्यार्थ्यांनी एकप्रकारची प्रेरणा घ्यावी असे सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुभेदार श्री कन्हैया, हवालदार प्रदीपकुमार, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, प्रा.विश्वजित कुराडे यांच्यासह निखील कदम यांचे आई-वडील व नातेवाईक, प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.अशोक मोरमारे यांनी केले. आभार एन.सी.सी.विभाग प्रमुख डॉ.राहुल मगदूम यांनी मानले.



