Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज शहरात बंद अवस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करा

शहरात चौका चौकातील स्पीकरही दुरुस्त करण्याची मनसेची मागणी 




गडहिंग्लज : पोलीस ठाण्याला निवेदन देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले व शहराध्यक्ष केप्पांना कोरी. 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शहरात महालक्ष्मी यात्रा कमिटीने बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद अवस्थेत आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करून कार्यान्वित करावीत तसेच चौका चौकात बसविण्यात आलेले स्पीकर देखील नादुरुस्त असून त्यांचीही दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी निवेदनातून गडहिंग्लज पोलीस ठाण्याकडे केली आहे.




या निवेदनात म्हटले आहे की,  काही वर्षांपूर्वी गडहिंग्लज शहरात महालक्ष्मी यात्रा कमिटीने लोक वर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे शहरात बसवून पोलीस प्रशासनाला हस्तांतरित केले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या  माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत शहरातील सर्व ठिकाणी लक्ष ठेवण्यास तसेच मोठ्या गुन्ह्याची उकल करण्यात पुरावा म्हणून उपयोग होत असतो. अशा परिस्थितीत गडहिंग्लज शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडे  तिसरा डोळा म्हणून पाहिले जात होते. त्याचमुळे या उपक्रमाचे संपूर्ण शहरवासीयांकडून कौतुकही करण्यात आले होते. सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या  माध्यमातून श्री लक्ष्मी देवीची मोठी यात्रा सुरळीतपणे पार पडली होती. यावेळी त्याचा वापर प्रशासनाला मोठ्या प्रमाणात झाला होता. परंतु आज हेच कॅमेरे बंद असून यातील बरेचसे मोडकळीसही आलेले आहेत. काही ठिकाणी हे कॅमेरे अस्तित्वातही नाहीत. यात्रा कमिटीने दिलेल्या कॅमेऱ्यांची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती अथवा देखभाल पोलीस प्रशासनाकडून झालेली दिसत नाही. यात्रा कमिटीने केलेल्या उपक्रमाची कोणतीच किंमत प्रशासनाला नाही का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला असून एखादा मोठा गुन्हा घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होताना दिसत आहे. नुकतेच सांगली आणि बालिंगा येथे सशस्त्र दरोड्याच्या दोन घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत सीसीटीव्ही खूप महत्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे शहरातील हे बंद अवस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात यावीत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 



चौका-चौकातील स्पीकरही नादुरुस्त 


त्याचबरोबर शहरातील चौका चौकात स्पीकर बसवले आहेत. जेणेकरून पोलीस निरीक्षक यांना ऑफिसमध्ये बसून सूचना करता येतील. मात्र सध्या हे स्पीकर सुद्धा नादुरुस्त आहेत. त्यामुळे हे स्पीकर देखील दुरुस्त करून सुरू करणे गरजेचे आहे याकडे देखील या निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष नागेश  चौगुले, शहराध्यक्ष केप्पांना कोरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.