गुन्ह्यात चोरीची मोटरसायकल वापरल्याचे उघडकीस
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी बसर्गे येथील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. कार्तिक गुरव (वय 29), प्रफुल्ल कांबळे (वय 23), शुभम गुळनवार (वय 23, सर्व राहणार बसर्गे ) अशी अटक केलेल्या संशयतांची नावे आहेत. या प्रकरणातील आणखी एक संशयित फरार असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. याबाबतची माहिती पोलीस उपाधीक्षक राजीव नवले यांनी पत्रकारांना दिली. यावेळी पोलीस निरीक्षक गजानन सरगर, उपनिरीक्षक शितल शिसाळ, विक्रम वडणे उपस्थित होते.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती की, ८ जून रोजी सकाळी 5.28 वाजता डॉ. व्हसकोटी मॉर्निंग वॉकसाठी चालत जात होते. यावेळी चार अज्ञातांनी व्हसकोटी यांना अडवून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलीस उपाधीक्षक राजीव नवले, पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली होती.
व्हसकोटी यांनी रीतसर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक शितल शिसाळ यांनी सदर प्रकरणाचा तपास केला. हल्ला झालेल्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. यामध्ये हल्लेखोर हल्ला केल्यानंतर मोटरसायकल वरून पलायन केल्याचे दिसून आले. घटनास्थळी झटापटीत व्हसकोटी यांच्या गळ्यातील हिसकावलेल्या सोन्याच्या चेनचा तुकडा पोलिसांच्या हाती लागला होता. पोलीस उपनिरीक्षक शितल शिसाळ यांनी तपासाची चक्रे गतिमान फिरवत या प्रकरणातील चार पैकी तीन संशयितांना गजाआड केले. चौथ्या संशयिताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक शितल शिसाळ करत आहेत.
गुन्ह्यात चोरीच्या मोटरसायकलचा वापर
गंगाधर व्हसकोटी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयीतांपैकी एकाने या गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटरसायकल वापरल्याचे तपासा दरम्यान उघडकीस आल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक राजीव नवले यांनी दिली. गुन्ह्यात वापरलेली सदर मोटरसायकल चोरीस गेल्याची नोंद 13 मे रोजी गडहिंग्लज पोलिसात दाखल झाली होती. त्यामुळे मोटरसायकल चोरीचा गुन्हाही उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

