गडहिंग्लज(प्रतिनिधी): तेरणी येथील कै.आप्पासाहेब सिद्धाप्पा हालबागोळ यांच्या मुलांना शिवसेनेचेे नेते व ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रियाजभाई शमनजी यांच्याकडून शैक्षणिक साहित्य देण्यात आले. सदर साहित्याचे वाटप शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते कल्लाप्पा मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच करवीर उथळे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तेरणी येथील आप्पासाहेब हालबागोळ यांचा दोन वर्षांपूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने हालबागोळ कुटुंबावर संकट कोसळले होते. याची माहिती शिवसेनेचे नेते डॉ. रियाजभाई शमनजी यांना त्यावेळी मिळताच त्यांनी तातडीने मयत आप्पासाहेब यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत सामाजिक बांधिलकी जपली होती. मयत आप्पासाहेब यांची तिन्ही मुले हालाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांनी शमनजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तीनही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत कुटुंबाला मोठा आधार दिला होता.
या पार्श्वभूमीवर दरवर्षी या तिन्ही मुलांना लागणारे शैक्षणिक साहित्य डॉ. रियाजभाई शमनजी देतात. याही वर्षी मुलांना वह्या, पुस्तके, स्कूल बॅग आदी साहित्य डॉ.शमनजी यांच्याकडून मुलांना पाठवून देण्यात आले. सदर शैक्षणिक साहित्य रविवारी हालबागोळ कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते कल्लाप्पा मगदूम, बाबू मगदूम, सरपंच करवीर उथळे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य मोसिम मुल्ला, रमेश पुजेरी, बाळासाहेब निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते रियाज जमादार, बसवेश्वर दूध संस्थेचे व्हाईस चेअरमन संजय जोशी यांच्यासह हालबागोळ कुटुंबीय उपस्थित होते.



