Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीच्या बसवेश्वर दूध संस्थेने घालून दिला सहकारात आदर्श

पंचवार्षिक निवडणूक गुप्त मतदानानेच, मात्र तिही बिन खर्चाची


अख्ख्या महाराष्ट्राने दखल घ्यावी अशी आगळीवेगळी निवडणुकीची संकल्पना   


खर्चाला फाटा देत सभासद, ग्राहकांच्या हिताला दिले प्राधान्य




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी गावातील श्री बसवेश्वर सहकारी दूध व्यवसायिक संस्थेने सहकारात संपूर्ण महाराष्ट्राने दखल घ्यावे अशा आगळ्यावेगळ्या संकल्पनेने पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया राबवीत आहे. मतदान तर गुप्तच होणार, मात्र तेही खर्चमुक्त. या संकल्पनेवर आधारित आतापर्यंत संस्थेच्या दोन निवडणूकही यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. या संकल्पनेनुसार आता ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. 



श्री बसवेश्वर दूध संस्थेची १९९५ साली प्रगतशील शेतकरी व पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुणराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आली. या संस्थेत एकूण ३३६ दूध उत्पादक सभासद आहेत. तब्बल २८ वर्षे झाली या संस्थेने सभासदांचे हित जोपासत सहकारात गरुड भरारी मारली आहे.



पंचवार्षिक निवडणूक म्हटले की अवाढव्य खर्च असतो. संस्थेपाठोपाठ रिंगणातील उमेदवारांनाही निवडणुकीसाठी खर्च करावा लागतो. हा होणारा खर्चाचा अपव्य टाळण्यासाठी संस्थेचे चेअरमन अरुणराव देसाई, व्हाईस चेअरमन संजय जोशी यांच्यासह सर्व संचालकांच्या मार्गदर्शनाखाली बिन खर्चाची एक आगळ्यावेगळ्या पद्धतीची निवडणूक प्रक्रिया राबवून खर्चाला फाटा देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि दोन निवडणूकाही यशस्वीरीत्या पारही पाडण्यातही आल्या. या पद्धतीने आता ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक होत आहे.



अशी आहे बिन खर्चाची गुप्त मतदान निवडणूक पद्धत


संस्थेतच दररोज सकाळी संध्याकाळी तब्बल दहा दिवस उमेदवार चाचपणीसाठी सभासदांना गुप्त मतदान पद्धतीने संधी दिली जाते. रोज सकाळी ५:३० ते ९ व संध्याकाळी ५:३० ते ९ गुप्त मतदानासाठी सभासदांना वेळ देण्यात येतो. उमेदवार निवडीसाठी सभासदांना संस्थेत आल्यानंतर सर्व सभासदांची यादी त्यांच्या हातात दिली जाते. या यादीतून त्यांना आपल्या पसंतीचे सर्वसाधारण गटातून सहा, इतर मागासवर्ग एक, भटक्या विमुक्त जाती एक, महिला प्रतिनिधी दोन, अनुसूचित जाती जमाती गटातून एक असे एकूण ११ उमेदवार निवडावयाची. नावे निवडल्यानंतर सभासदांना  मतपत्रिका दिल्या जातात. या मतपत्रिकांवर विविध गटातून निवडलेली अकरा उमेदवारांची नावे सभासदांना लिहावयाची आहेत. या मतपत्रिका टाकण्यासाठी प्रत्येक गटाचे एकूण पाच डबे ठेवण्यात येतात. यामध्ये गटनिहाय मतपत्रिका या डब्यांमध्ये टाकावयाच्या आहेत. ज्या सभासदांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी दोन प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येते. हे प्रतिनिधी या सभासदांना यासाठी मदत करतात. सभासदांचे गुप्त मतदान झाल्यानंतर याची  संस्था व्यतिरिक्त बाहेरील प्रतिनिधींना बोलावून मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाते. यामध्ये ज्या उमेदवारांना सर्वाधिक मते पडली आहेत असे पाच गटातील ११ उमेदवारांची यादी तयार केली जाते. सभासदांनी पसंती दिलेले हे ११ उमेदवार संचालक म्हणून निवडले जातात.  सदर उमेदवारांची यादी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे सादर करून रीतसर प्रक्रिया पूर्ण करून यादी अंतिम केली जाते.


निवडणूक प्रक्रिया सुरू, सभासदांना मतदान करण्याचे आवाहन


पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवार चाचपणीची प्रक्रिया दिनांक ९ जून पासून सुरू झाली असून ही प्रक्रिया १८ जून पर्यंत चालणार आहे. रोज सकाळी व संध्याकाळी साडेपाच ते नऊ या वेळेत गुप्त मतदान पद्धतीने उमेदवार चाचपणीचा हा कार्यक्रम पार पडला जाणार आहे. संस्थेच्या सर्व सभासदांनी गुप्त मतदान करून सहकार्य करावे असे आवाहन संस्थेच्या वतीने सभासदांना करण्यात आले आहे.  ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी सचिव करवीर नावलगी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.





संस्थेकडून दूध दर फरक वाटपाचा उच्चांक


संस्थेने नेहमीच सभासद हित जोपासत आहे. संस्थेकडून दूध दर फरक बिलापोटी तब्बल 19 टक्के प्रमाणे सभासदांना लाभ देण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षातील हा उच्चांक आहे. त्या पाठोपाठच दसरा, दीपावली, नागपंचमी या सणासाठी सभासदांसह ग्राहकांना देखील फराळासाठी लागणारे साहित्य नित्यनियमाने दरवर्षी दिले जाते. संस्थेचा पारदर्शक कारभार व सभासद हित यामुळे या संस्थेशी सभासदांचे नाते अगदी दृढ झाले आहे. दररोज सकाळ व संध्याकाळ असे मिळून एकूण १४०० लिटर दूध संकलन या संस्थेत केले जाते.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.