शिवराज महाविद्यालय व गडहिंग्लज पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शांतता सलोखा मार्गदर्शन कार्यक्रम
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करणे आवश्यक आहे. चुकीचा स्टेटस ठेऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे आवाहन गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी केले.
येथील शिवराज महाविद्यालय व गडहिंग्लज पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शांतता सलोखा मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी शांतता सलोखा बाबत मार्गदर्शन केले. शाहीर सदानंद शिंदे यांनी आपल्या शाहिरीतून सलोखाबाबत जनजागृती केली.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे म्हणाले, युवा पिढी ही आपल्या देशाचे भवितव्य घडविणारी पिढी आहे. युवा पिढीने चांगले शिक्षण घेऊन आपले करिअर घडविणे गरजेचे आहे. आपल्याला मिळणाऱ्या शिक्षणाचा वापर विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टीसाठी करणे गरजेचे आहे. मोबाईलवर चुकीचे स्टेटस ठेऊन अथवा चुकीच्या गोष्टीला बळी पडू नये याची वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करू नका. विद्यार्थ्यांनी याबाबत कटाक्ष पाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनीही विद्यार्थ्यांनी आपले करिअर चांगल्या पद्धतीने घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपले करिअर घडविण्यात आपल्या आई-वडिलांचे व शिक्षकांचे कष्ट मोलाचे आहेत. त्यांचा आदर ठेवणे महत्वाचे आहे. आपण आता शिक्षण घेत जीवनाच्या मुख्य टप्प्यावर येऊन पोहोचला आहात. आपले करिअर घडताना कोणतीही चुकीची गोष्ट करू नका. आपल्या करिअरला अडथळा निर्माण होणाऱ्या वाईट गोष्टींपासून दूर राहावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रसेवा दलाचे हसन देसाई, श्री. पाटोळे, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, बसवराज आजरी, श्री.नंदनवाडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, केमिस्ट्री विभाग प्रमुख डॉ. ए. एम. हसुरे यांच्यासह अन्य मान्यवर, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


