गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध संधी व करिअरबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे म्हणाले, वाणिज्य शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरबाबत वेळीच विचार करणे गरजेचे आहे. वाणिज्य शाखा ही अत्यंत महत्वाची शाखा आहे. वाणिज्य शाखेतून करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप संधी आहेत. या शाखेत करिअर करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांना बँकिंग, सी.ए., सी.एम.ए., कार्पोरेट सेक्टर, पोस्ट ऑफिस, वेगवेगळ्या कंपनीमध्ये नोकरीच्या संधी आहेत. बदलत्या काळानुसार ही शाखा अपडेट होत आहे. बी.कॉम आय.टी. मधून करिअर करण्याची अनेक संधी आपली वाट पाहत आहेत या संधीचा लाभ वेळीच घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेतून करिअर करणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी केमिस्ट्री विभाग प्रमुख डॉ.ए.एम.हसुरे, इंग्रजी माध्यम वाणिज्य विभागाचे समन्वयक डॉ.महेश चौगुले, बी.बी.ए.विभाग प्रमुख प्रा. आर. डी. कमते, प्रा.बियामा वाटंगी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वाणिज्य विभागाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. आभार पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी मानले.

