गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोरोना काळात डिजिटल मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सामाजिक बांधिलकी जपत आपले काम प्रामाणिकपणे करणाऱ्या डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना संघटनेमार्फत व्यासपीठ व राजमान्यता मिळण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नाला यश मिळत असून राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारने डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना श्रमिक पत्रकारांच्या कक्षेत घेतले आहे. डिजिटल मीडिया संघटनेच्या लढ्याला मिळालेले हे पहिले यश असून भविष्यात डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळवून देण्याच्या दृष्टीने संघटनेच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील आहे अशी ग्वाही देत शासन दरबारी तशी प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संपादक राजा माने यांनी दिली.
गडहिंग्लज येथे गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील डिजिटल मीडियाच्या संपादक, पत्रकारांच्या बैठकीत संपादक राजा माने बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना अध्यक्ष राजा माने पुढे म्हणाले, कोरोना काळापासून डिजिटल मीडियाचा विस्तार हा मोठ्या प्रमाणात होत गेला. या कालावधीत डिजिटल मीडियाने सामाजिक बांधिलकी जपत उत्कृष्टरित्या काम केले आहे. कोरोना काळात डिजिटल मीडियाने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. नव्याने उदयास आलेल्या या माध्यमाला एक व्यासपीठ व न्याय मिळवून देण्यासाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकारांची संघटना राज्य पातळीवर स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून डिजिटल मीडिया पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी मांडत वारंवार लक्ष वेधण्यात आले. याचेच फलित म्हणून महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने डिजिटल मीडियासह इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ आस्थापनांना श्रमिक पत्रकार कक्षेत घेतले आहे. त्यामुळे डिजिटल मीडिया क्षेत्रातील नव्या ऐतिहासिक पर्वाची ही सुरुवातच म्हणावी लागेल. संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नाला पहिल्या टप्प्यातील हे मोठे यश मानावे लागेल. भविष्यात डिजिटल मीडियाला अधिकृत राजमान्यता मिळेल यात शंका नाही. तशी शासन दरबारी प्रक्रियाही सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटल मीडिया संपादक व पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी प्रामाणिक व चांगल्या पद्धतीने काम करावे. आपल्याला कमी समजणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करून उत्तम पद्धतीने काम कसे करता येईल याकडे जास्त लक्ष द्यावे. डिजिटल मीडियाचे पत्रकार म्हणून काम करत असताना सर्वांनी आपली आचारसंहिता पाळावी जेणेकरून सरकार दरबारी पाठपुरावा करत असताना पत्रकारितेची आचारसंहिता पाळून काम करणारी संघटना आहे हे शासनालाही आपल्याला सांगता येईल व त्या दृष्टीने पाठपुरावा करून आपल्या मागण्या मान्य करून घेता येतील. डिजिटल मीडिया संपादक पत्रकारांची संघटना सदैव तुमच्या पाठीशी राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
आपली लेखणी विकू नका, प्रामाणिक काम करा : ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे
ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे म्हणाले, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारितेचे एक नवे माध्यम उदयास आले आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी प्रामुख्याने तळागाळातील सर्वसामान्यांचे विविध प्रश्न व त्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करावा. आपली लेखणी न विकता पत्रकारांनी प्रामाणिकपणे काम करावे असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. यावेळी यावेळी त्यांनी पूर्वीची पत्रकारिता व आजची बदलती पत्रकारिता यातील फरक सांगून त्या काळातील काही जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
संघटना सदैव पत्रकारांच्या पाठीशी : जिल्हाध्यक्ष संपादक सुहास पाटील
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संपादक सुहास पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील डिजिटल मीडियाच्या पत्रकारांच्या पाठीशी संघटना सदैव पाठीशी असेल. त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचा संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल. गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी संघटित राहावे असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात पत्रकार दीपक मांगले यांनी बैठकीचा हेतू स्पष्ट करत गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांच्या विविध समस्या व अडीअडचणी संघटनेच्या माध्यमातून सुटाव्यात यासाठी त्यांना संघटित केले आहे. त्यांना या बैठकीच्या माध्यमातून मार्गदर्शन व सहकार्य लाभावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने स्वतः बैठकीस उपस्थित राहून डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना पाठबळ दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत श्री. माने यांना धन्यवाद दिले.
यावेळी 'सह्याद्री न्यूज मराठी'चे संपादक संभाजी जाधव, सीएल न्यूजचे पत्रकार चेतन शेरेगार, 'गडहिंग्लज बुलेटीन'चे संपादक संतोष नाईक, 'सह्याद्री दर्पण'चे संपादक संतोष सावंत भोसले, 'एमएच टाइम्स'चे पत्रकार अमित कांबळे, 'सीएल माझा'चे संपादक संतोष सुतार, पत्रकार उत्तम पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील डिजिटल मीडियाचे संपादक व पत्रकार उपस्थित होते. स्वागत पत्रकार दीपक मांगले यांनी केले. आभार संपादक संभाजी जाधव यांनी मानले.








