गडहिंग्लज(प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालय व विवेकानंद योग केंद्र गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने 'जागतिक योग दिन' संपन्न झाला. या कार्यक्रमास शिवराज विद्या संकुलाचे शिवराज सचिव डॉ.अनिल कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम,कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा.जयवंत पाटील यांनी केले.या कार्यक्रमात विवेकानंद योग केंद्राच्या कार्यवाह योगशिक्षिका सौ.सुरेखा कळसगोंडा यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये निरोगी व निरामय जीवन जगण्यासाठी योगाशिवाय पर्याय नाही. आपले शरीर व मन सदृढ राहण्यासाठी सर्वांनी नियमित योगासन करणे गरजेचे आहे. बारा सूर्यनमस्कार व प्राणायाम नियमित करणे अत्यंत गरजेचे आहे. योगामुळे आपण नेहमी प्रफुल्लीत व ताजेतवाने राहू शकतो. योगासन मनपूर्वक केल्याने आपल्यातील उर्जाशक्ती सतत कार्यरत राहते. योगावर श्रद्धा व विश्वास ठेवा. योगामुळे मनावरील ताण निवारण होत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी विवेकानंद योग केंद्राच्या योग साधक-साधिका यांच्या समवेत योगाची प्रात्यक्षिके सादर केली.
प्राचार्य डॉ.एस. एम.कदम यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आज जागतिक योग दिन सर्वत्र साजरा होत आहे. हजारो वर्षापूर्वी ऋग्वेदमध्ये योगाचे महत्व सांगितले आहे. भारतामध्ये २०१४ मध्ये जागतिक परिषद भरविण्यात आली होती. त्यामध्ये योगाचे महत्व पटवून देण्यासाठी १७७ देशांनी जागतिक योग दिन साजरा करण्याबाबत प्रामुख्याने मांडण्यात आले. तेव्हापासून २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा होत आहे, असे सांगून त्यांनी रोज पंधरा मिनिटे योगा करून तंदुरुस्त व निरोगी जीवन जगावे असे आवाहन केले.
यावेळी दिग्दर्शक अमोल देसाई, ज्युनिअरचे पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, ग्रंथपाल संदीप कुराडे, डॉ. जी. जी. गायकवाड, प्रा.डी.पी.खेडकर, शिवराज इंग्लिश मेडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.गौरी शिंदे , प्रशासकीय प्रमुख ए.बी.पाटील, आदींसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा विभाग प्रमुख डॉ.राहुल मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागाच्यावतीने करण्यात आले.






