गडहिंग्लज (प्रतिनिधी): नौकुड येथील सुशांत मारुती गोडसे यांची सैन्यदलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच गोडसे परिवारामधील माजी सैनिक भिमराव गोडसे, उमेश गोडसे व जीवन गोडसे यांचा देखील सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच शुक्राचार्य चोथे होते.
यावेळी बोलताना सरपंच शुक्राचार्य चोथे म्हणाले, इथून पुढे गावातील सर्व मुलांना दररोज संध्याकाळी ७ ते १० या वेळेत अभ्यास करण्यासाठी मराठी शाळेमध्ये सोय करून दिली जाईल. जेणेकरून त्यांच्या अभ्यास बरोबर त्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनसुद्धा केले जाईल. त्यासाठी त्यांना ज्ञानगंगा वाचनालयमार्फत पुस्तके उपलब्ध करून दिले जातील, तसेच दक्षतेसाठी सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविले जातील. शाळेतील खोली उपलब्ध करून देण्यासाठी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष व मुख्याध्यापक यांनी पुढाकार घ्यावा आशी विनंती त्यानी केली.
तसेच गावातील आजी- माजी सैनिक यांनी गावामध्ये सैनिक संघटना स्थापन करावी व गावातील सर्व मुलांना मार्गदर्शन करावे असे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी सदाशिव घेवडे, आर.डी कोरे, गजेंद्र मांगले, सचिन गोडसे यांनीही मनोगते व्यक्त केली.
यावेळी उपसरपंच सौ.रेखा सरदेसाई, ग्रामपंचायत सदस्या सौ. हिराबाई चौगुले, सौ.सुवर्णा गोसावी, सौ.सुरेखा गुरव, विजय गुरव, ग्रामसंघ अध्यक्षा सौ.शितल मांगले, सदाशिव घेवडे, अशोक गुरव, पांडुरंग गावडे, गजेंद्र मांगले, मधुकर चव्हाण, सूर्यकांत गोईलकर, मारुती सुतार, सेवानिवृत्त तहसीलदार आर. डी. कोरे, देवस्थान कमिटी अध्यक्ष सुनिल शेलार, तंटामुक्त समिती अध्यक्ष भाऊसाहेब लोहार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शुक्राचार्य चव्हाण, केदारलिंग सेवा संस्था चेअरमन बाबुराव कदम, ज्ञानगंगा सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेताजी मांगले यांनी केले. आभार ग्रामसेवक विजय जाधव यांनी मानले.





