गडहिंग्लज (प्रतिनिधी): जोपर्यंत विद्या मंदिर नौकुड शाळेत बदली शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांसह ग्रामस्थांनी बुधवारी घेतल्याने अखेर गुरुवारी गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी या शाळेस शिक्षक उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. सरपंच शुक्राचार्य चोथे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीने हजर झालेल्या शिक्षकाचे स्वागत केले.
विद्या मंदिर नौकुड प्राथमिक शाळेतील तीन शिक्षकांची बदली झाली आहे. शाळेत दुसरे शिक्षक मिळण्याबाबत दिनांक ६ जून रोजी पंचायत समिती शिक्षण विभागाकडे संदर्भात निवेदन देऊन लक्ष देण्यात आले होते. मात्र शाळेत एकही शिक्षक हजर झालेले नव्हते. त्यामुळे जोपर्यंत शाळेत शिक्षक हजर होत नाहीत तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा पवित्रा पालकांसह ग्रामस्थांनी घेतला होता. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आले होते. याची दखल गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी घेत बदली शिक्षक उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले. या ठिकाणी शिक्षक अनिल गोणी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
नौकुड प्राथमिक शाळेत शिक्षक उपलब्ध करून घेण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक यांचे सहकार्य लाभले. गेले १० दिवस शाळेत शिक्षक मिळविण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांना आज यश मिळाले. नवीन रुजू झालेल्या शिक्षकांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ. सुवर्णा गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच शुक्राचार्य चोथे, ग्रामसेवक, विजय जाधव, देवस्थान कमिटी अध्यक्ष सुनिल शेलार, तंटामुक्त समिती अध्यक्ष भाऊसाहेब लोहार, संभाजी चौगुले, श्रीकांत गुरव, चाळू गुरव, मुख्याध्यापक श्री. मगदूम, श्री. पाथरवट, श्री.देवकर, श्री.गव्हाने उपस्थित होते.


