Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुक्यात गांजा शेतीचा पर्दाफाश; कोल्हापूर एलसीबीची मोठी कारवाई

हेब्बाळ येथे उसाच्या शेतात गांजाची लागवड  


सात ते आठ फूट उंचीची गांजाची ७५ झाडे पोलिसांकडून जप्त


एकूण ७ लाख ५७ हजार रुपये  किमतीचा गांजा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील हेब्बाळ येथे गांजाची शेती केल्याचे उघडकीस आले असून कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकत एकूण ७५ गांजाची झाडे जप्त केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. १०७ किलो ४०० ग्रॅम वजनाचा एकूण ७ लाख ५७ हजार रुपये किमतीचा हा गांजा आहे. आतापर्यंतच्या इतिहासात तालुक्यातील गांजाची ही सर्वात मोठी कारवाई आहे. यातील संशयित फरार झाले असून  याप्रकरणी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 



याबाबतची अधिक माहिती अशी की, तालुक्यातील गडहिंग्लज- संकेश्वर या आंतरराज्य मार्गावर हेब्बाळ येथे हसुरचंपू रोडजवळ शेतात विष्णू पिरापगोळ व काशाप्पा पिरापगोळ यांनी ऊस पिकात गांजाची लागवड केल्याची खबर कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला(एलसीबी) मिळाली होती. यानुसार या पथकाने शुक्रवारी सायंकाळी या ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी संशयितांनी उसाच्या शेताच्या आडोशाला लावलेली एकूण ७५ गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली. ही गांजाची झाडे सात ते आठ फूट उंचीची होती. छापा पडताच यातील संशयित फरार झाले आहेत. दरम्यान, दोन महिन्यापूर्वीच गडहिंग्लज पोलिसांनी तालुक्यात गांजा विरोधी मोहीम राबवून कारवाई देखील केली होती. मात्र हेब्बाळ येथे चक्क गांजाचीच शेती सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.