अजितदादा पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील
राज्यात राष्ट्रवादीमध्ये उभी फूट
राष्ट्रवादी म्हणूनच सरकारमध्ये सामील
घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढविणार : अजितदादा पवार
मुंबई : राज्यात शिवसेने पठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आज उभी फूट पडली. राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप घडवून आणला. अजितदादांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, पत्रकार परिषदेत अजितदादा पवार व छगन भुजबळ यांनी आपण पक्ष बदलला नसून घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला.
अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, संजय बनसोडे, धर्मराव आत्राम, अनिल पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.
अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण पक्ष सोडला नसून राष्ट्रवादी म्हणूनच सरकारमध्ये सामील झालो आहोत. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुका घड्याळ चिन्हावरच लढवणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला. आगामी निवडणुका या पंतप्रधान मोदींसोबत राहूनच लढवणार असल्याचे देखील स्पष्ट केले.

