मुंबई : पंतप्रधान मोदी राष्ट्रवादी पक्ष भ्रष्टाचारी आहे असे म्हणतात. ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले त्याच राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांनी मंत्री केले. राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी या आरोपातून त्यांनी मुक्त केले. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्या कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार व पुन्हा एकदा लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादी पक्षाची बांधणी करणार आहे. आपण आता कोर्टात नाही तर जनतेत जाऊ असे सांगून कोणीही काहीही दावा केला तरी पक्ष आणि घड्याळ चिन्हाला काहीही होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही सहकारी आपल्या संपर्कात असल्याचे देखील पवार यांनी पत्रकारांना सांगितले.
ज्येष्ठ नेते शरद पवार पुढे म्हणाले, ६ जूनला पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीपूर्वीच काही सहकाऱ्यांनी आधीच वेगळी भूमिका घेतली होती. किती लोकांनी वेगळी भूमिका घेतली हे लवकरच समोर येईल. आजचा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही असे सांगून महाराष्ट्रातील जनतेवर माझा संपूर्ण विश्वास आहे. आम्ही न्यायालया ऐवजी जनतेत जाऊन न्याय मागू. राज्यातील मतदारांवर माझा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
या घडामोडी घडल्यानंतर देशातील अनेक नेत्यांचे मला फोन आल्याचे देखील पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जे घडलं त्याची मला चिंता नाही, मात्र जे गेले त्यांच्या भवितव्याची मला चिंता आहे अशी टिपणी देखील पवार यांनी केली. सरकारचे भवितव्य काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर भविष्य सांगायला मी ज्योतिषी नाही? असे पवार म्हणाले. पक्षाचा आश्वासक चेहरा कोणता असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर 'शरद पवार' असे उत्तर पवारांनी दिल्यानंतर पत्रकार परिषदेत हशा पिकला.
पवार पुढे म्हणाले, कोणीही काही दावा केला तरी माझा लोकांवर विश्वास आहे. मी लोकांमध्ये जाणार आहे. लोकांमध्ये जाऊन त्यांचा पाठिंबा मिळवणार आहे. आमची खरी शक्ती सामान्य माणूस व कार्यकर्ता आहे. पक्ष फुटला असं मी म्हणणार नाही. पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यानंतर आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली. ईडीच्या कारवायामुळे काहीजण अस्वस्थ होते असे सांगून काही आमदारांची नावे पवार यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवली. 'आज जे वेगळं झालं त्याच श्रेय मोदींना' अशी मिश्किल टिपणी देखील पवारांनी केली. शपथविधीच्या कार्यक्रमात अनेकांचे चेहरे चिंताजनक होते असेही पवार म्हणाले. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडी म्हणून यापुढील काळात देखील एकत्रित काम करतील असेही पवार यांनी सांगितले.

