राष्ट्रसेवा दल व सर्व समविचारी संघटना यांच्यावतीने प्रांताधिकारी यांना निवेदन
(छायाचित्र: मज्जिद किल्लेदार)
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरेकुडी (ता. चिक्कोडी) येथील नंदीपर्वत आश्रमातील कामकुमार नंदी महाराज याच्या खुन्याला कडक शिक्षा करण्यात यावी यासह विविध मागण्या राष्ट्रसेवा दल व सर्व समविचारी संघटना यांच्यावतीने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटकातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमातील कामकुमार नंदीमहाराज यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील खुन्याला कठोर शिक्षा करण्यात यावी, तसेच परळी येथील जरीनखान यांची पोलीस कोठडीत हत्या करण्यात आली त्याचीही चौकशी होवून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती केली म्हणून अक्षय भालेराव याची हत्या करण्यात आली, त्याची चौकशी होवून यातील दोषीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, पुरोगामी महाराष्ट्रात सातत्याने महिलांच्यावर होणारे अन्याय अत्याचार थांबावेत, महाराष्ट्रात अल्पसंख्यांक समाजावर सध्या सुरु असणारे भ्याड हल्ले थांबवून सामाजिक सलोखा राखावा. भारत हा सर्व जाती समावेशक देश आहे, त्यामुळे सर्व जातीधर्माच्या लोकांना अभय व संरक्षण मिळायला हवे. आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर रफिक पटेल, महेश आरभावी, उज्वला दळवी, उर्मिला कदम, प्रा.जी.बी बारदेस्कर, रमजान अत्तार, महादेवअण्णा साखरे, प्रा. शिवाजीराव होडगे, प्राचार्य साताप्पा कांबळे, आप्पासाहेब कमलाकर, बाळासाहेब घुगरे, गणपतराव पाटोळे, प्रा. सुभाष पाटील, चंद्रकांत गुजर, सौरभ मणियार, मज्जीद किल्लेदार, सुनीलभाई दोशी, प्रा. ज्ञानराजा चिघळीकर, अरुणा शिंदे, गीता पाटील, प्रा. अनिल उंदरे, प्रा. प्रकाश कांबळे, प्रा. पी.डी.पाटील, महावीर दसुरकर, प्रकाश शहा, उमेश पोकळे, डॉ. के.आर. तनंगे, श्रीरंग चौगुले, योगेश शहा, सचिन मेहता आदींच्या सह्या आहेत.

