Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संजय गांधी, श्रावणबाळ लाभार्थ्यांकडून हयातीचा दुबार दाखला मागू नका!

मनसेच्यावतीने तहसीलदार कार्यालयाला निवेदन 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज  तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांकडून दुबार हयातीचा दाखला मागितला असल्याने लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत असून हे तातडीने रद्द करावे व महिन्यापूर्वीच दिलेला हयातीचा  दाखला ग्राह्य मानावा अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी तहसीलदार कार्यालयाकडे निवेदनातून केली आहे.




या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ, दिव्यांग यासह निराधारानी मागील महिन्यात आपल्या हयातीचे दाखले जमा केले आहेत. तरीही दोन दिवसापूर्वी पुन्हा हयातीच्या दाखल्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात किंवा संपूर्ण राज्यात कुठेही हयातीच्या दुबार दाखल्याची मागणी केली नाही. गडहिंग्लज तालुक्यात दुबार हयातीच्या दाखल्याची मागणी केल्यामुळे निराधार व अपंगाना वेळ व पैशाचा भुर्दंड बसणार आहे. मुळातच गरीब व गरजू असणाऱ्या निराधारांना तुटपुंजे अनुदान मिळते त्यात पुन्हा हा खर्च म्हणजे त्याच्यावर अन्याय आहे.



अनुदान मंजूर करण्या पासून ते बँकेत खाते उघडेपर्यंत महसूल विभागचे सही शिक्के असतात. आतापर्यंत हयातीच्या दाखल्यावरही तलाठी यांची सही होत होती, पण यावेळी हयातीच्या दाखल्यावर बँक अधिकाऱ्याची सही बंधनकारक केली आहे. त्यामुळे लाभार्थी यांना पुन्हा बँकेत हेलपाटे मारवावे लागणार आहेत. यामुळे वयोवृद्ध व अपंगना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे तात्काळ दुबार हयातीच्या दाखल्याची अट व त्यावर बँक अधिकारी सही शिक्क्याची अट रद्द करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देखील निवेदनातून दिला आहे.




यावेळी  मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, मनविसे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे, शहराध्यक्ष केप्पांना कोरी, संघटक विश्वनाथ  रायकर, प्रभाकर केसरकर, पांडुरंग पाटील, अभिजित जाधव, अविनाश चाळक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.