गडहिंग्लज (प्रतिनिधी): अमृत 2.0 अंतर्गत गडहिंग्लज शहरासाठी मंजूर पाणीपुरवठा योजनेची इ निविदा गडहिंग्लज नगरपरिषद मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तथापि याबाबत वरिष्ठ कार्यालयात निवेदनातून तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत गडहिंग्लज नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडून लेखी अहवाल मागविण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर टंकलेखनातील चूक झाल्यामुळे सदर योजनेची फेर निविदा काढण्यात यावी अशा सूचना दिल्या आहेत. अशी माहिती मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी दिली.
जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार या सदर कामाच्या पुन्हा नव्याने निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गडहिंग्लज शहरातील नागरिकांना लवकरात लवकर स्वच्छ, शुद्ध व मुबलक पाणी मिळण्यासाठी गडहिंग्लज नगरपरिषद कटीबद्ध असून यासाठी सर्वानी नव्या योजनेच्या पूर्णत्वासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी पत्रकातून केले आहे.

