शरद पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा हल्लाबोल
मुंबई : भाजपसोबत जायचे नव्हते तर पहाटेच्या शपथविधीला मला का जावयास सांगितले? असा सवाल करतानाच प्रत्येक वेळी मलाच 'विलन' केलं गेलं. असा जोरदार हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केला.
समर्थक आमदारांसह राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजितदादांनी बुधवारी मुंबईतील वांद्रे येथे सर्व समर्थक आमदारांसह राज्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी अजितदादा पवार बोलत होते. पहाटेच्या शपथविधीपूर्वी नेमके काय घडले होते याचा सविस्तर गौप्यस्फोट या बैठकीत अजितदादांनी केला.
यावेळी बोलताना अजितदादा पवार पुढे म्हणाले, साहेबांच्या छत्रछायेखाली मी तयार झालो आहे. आजही मी त्यांना दैवत मानतो. मी आज जो आहे तो पवार साहेबांच्यामुळे आहे. 1978 पासून पवारांना देशाने साथ दिली. असे सांगून अजितदादांनी विलीनीकरणाचा संपूर्ण इतिहास सांगितला. 'प्रत्येकाचा एक काळ असतो' असे सूचक वक्तव्यही अजितदादांनी यावेळी केले.
ते म्हणाले, माझ्या कामाची पद्धत संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. मी जातीपातीचे राजकारण कधीच करत नाही. सरकार गेल्यावर आमदारांची विकास कामे थांबली. आता ह्यापुढे या विकास कामांना पुन्हा एकदा गती मिळेल. आजही सर्व आमदार माझ्या पाठीशी आहेत. त्या बैठकीला गेलेले आमदारही माझ्या संपर्कात आहेत. मी सर्वांना घेऊन काम करणारा दबंग प्रतिमेचा नेता आहे हे सर्वांना ठाऊक आहे. सरकार कुठलेही असो आम्ही विकास कामे केलेली आहेत.
'त्या' शपथविधीला त्यांनीच पाठवलं
पहाटेच्या शपथविधीपूर्वी काय घडले याचा गौप्यस्फोट अजितदादांनी जाहीररीत्या पहिल्यांदाच या बैठकीत केला. ते म्हणाले, त्या पहाटेच्या शपथविधीला मला त्यांनीच पाठवलं. फडणवीस आणि मला सांगितलं गेलं की कुठेही बोलू नका. त्यानंतर अचानक सांगितले की सेनेसोबत जायचं आहे. भाजपसोबत जायचं नव्हतं तर आम्हाला का पाठवलं? असा सवाल देखील अजितदादांनी यावेळी केला. २०१९ मध्ये भाजप सोबत एकूण पाच बैठका झाल्याचे देखील अजितदादांनी यावेळी सांगितले. आपल्या भाषणात अजितदादांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
चिन्ह व पक्ष आमचाच राहील
राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगताना अजितदादा पवार म्हणाले, पक्ष व चिन्ह हे दोन्हीही आमचेच असतील. राष्ट्रवादीची झालेली राष्ट्रीय मान्यता आपल्याला पुन्हा मिळवायची आहे. यासाठी आपण अख्खा महाराष्ट्र पिंजून काढू. असे सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकतीने लढू असा निर्धारही अजितदादांनी यावेळी केला. कार्यकर्ते व जनतेला मी कधीच अंतर देणार नाही. साहेब तुम्ही आशीर्वाद द्या, चुकलं तर सांगा अशी भावनिक साद देखील अजितदादांनी शरद पवारांकडे घातली.
साहेब तुम्ही थांबणार कधी?
२०१४ पासून घडलेल्या घटनांकडे अजितदादांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले. ते म्हणाले, अनेकदा मी अपमान सहन केला आहे. प्रत्येकवेळी मलाच का विलन केलं जातंय? असा प्रश्न करत साहेब वय खूप झालं तुम्ही थांबणार कधी? वरिष्ठ नेता थांबला पाहिजे असे वक्तव्य अजितदादांनी आपल्या भाषणात केले.


