गडहिंग्लज (प्रतिनिधी): आजरा व गडहिंग्लज तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले असून गडहिंग्लज- चंदगड मार्गावरील भडगाव पुलावर पाणी येण्यास सुरू झाल्याने खबरदारी म्हणून रात्री नऊ वाजता या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तशी सूचना तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी दिल्या आहेत.
गडहिंग्लज तालुक्यात गेले दोन-तीन दिवस झाले पावसाचा जोर वाढला असून संततधार पावसामुळे तालुक्यातील निलजी बंधार्यांवर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक यापूर्वीच बंद झाली आहे. त्या पाठोपाठ गडहिंग्लज- चंदगड मार्गावरील हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावर देखील नदीच्या पाण्याचा विसर्ग वाढल्याने पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. दक्षता म्हणून रात्री नऊ वाजता या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या भडगाव पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आला आहे. रेस्क्यू तसेच महसूल विभागाची टीम देखील या ठिकाणी दाखल झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य वसंत नाईक, भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी हे देखील या ठिकाणी उपस्थित राहून वाहनधारकांना दक्षतेच्या सूचना देत आहेत.



