महागाव- गजरगाव- इंचनाळ- बेळगुंदी- गिजवणे मार्गे वाहतूक
हलकर्णी भागातील एसटी वाहतूक संकेश्वर मार्गे सुरु
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आजरा, आंबोलीसह गडहिंग्लज तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रविवारी रात्री हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक रात्री नऊ नंतर बंद करण्यात आली. यामुळे गडहिंग्लज चंदगड राजमार्गावरील वाहतूक बंद झाली. यामुळे चंदगडसह गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील वाहतूक विस्कळीत बनली. निलजी बंधाऱ्या पाठोपाठ भडगाव पुलावर देखील नदीचे पाणी आल्याने गडहिंग्लजचा पूर्व भागाशी असणारा संपर्क तुटला आहे.
रविवारी रात्री भडगाव पुलावर पाणी आल्यानंतर खबरदारी म्हणून पोलीस, महसूल व रेस्क्यू टीम, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य वसंत नाईक, पोलीस पाटील उदय पुजारी, तलाठी सौ रुपाली कांबळे या ठिकाणी थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
तालुक्यातील ऐनापुर, निलजी या बंधाऱ्यांवर देखील पाणी आल्याने येथील वाहतूक यापूर्वीच बंद झाली आहे. रविवारी भडगाव पुलावर देखील नदीचे पाणी आल्याने येथील वाहतूकही बंद झाली. हलकर्णी मार्गावरील एसटी वाहतूक संकेश्वर मार्गे सुरू आहे. दूध वाहतुकीच्या गाड्या देखील पर्यायी मार्गाने मार्गस्थ करण्यात आल्या. पुलावर पाणी आल्याने वाहतुक विस्कळीत झाली आहे.
निलजी बंधारा देखील पाण्याखाली, पूर्व भागाचा संपर्क तुटला
संततधार पावसामुळे निलजी येथील बंधारा देखील पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील हलकर्णी परिसराला संपर्क साधण्यासाठी हा मार्ग देखील जवळचा मानला जातो. बंधारा पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूकही पूर्णतः बंद झाली आहे. भडगाव पुलावर देखील पाणी आल्याने या मार्गे देखील वाहतूक बंद झाल्याने गडहिंग्लजचा पूर्व भागाशी असणारा संपर्क तुटला आहे.








