येथील मोहरमला एक आगळीवेगळी शेकडो वर्षांची परंपरा
हिंदूंनीच बांधले आहे पीर देवाचे मंदिर
संपूर्ण राज्यात प्रसिद्ध कळविकट्टेचा मोहरम
मोहरम सणातून कळविकट्टे ग्रामस्थ देतात सामाजिक सलोख्याचा संदेश
![]() |
| कळविकट्टे : येथे ग्रामस्थांनी बांधलेले पीर देवाचे मंदिर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील पूर्व भागात महाराष्ट्र- कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या कळविकट्टे या गावात मुस्लिम बांधवांचा मोहरम हा सण हिंदू बांधव साजरा करतात. इतकेच नाही तर येथील ग्रामस्थांनी पीर देवाचे मंदिर देखील लोकवर्गणीतून बांधून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. या गावात एकही मुस्लिम कुटुंबीय नसताना देखील केवळ श्रद्धेपोटी पीर देवाचे मंदिर हिंदू बांधवांनी बांधत सामाजिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण संपूर्ण महाराष्ट्राला घालून दिला आहे. येथील मोहरमला यात्रेचे स्वरूप असते.
दरवर्षी मुस्लिम बांधवांचा मोहरम हा सण आला की महाराष्ट्रात कळविकट्टे या गावची आठवण मात्र सर्वांनाच होते, हे मात्र नक्की. याचे कारणही असेच आहे. या गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना देखील शेकडो वर्षांपूर्वी गावात श्रद्धेपोटी हिंदू बांधवांनी पीर देवाची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर पिढ्यानपिढ्या ही श्रद्धा व परंपरा ग्रामस्थांनी अखंडितपणे जपली आहे. 1990 साली ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करत या ठिकाणी पीर देवाचे नवीन मंदिर बांधले. गावात मुस्लिम कुटुंबीय नसल्याने या मंदिराच्या पूजा- आर्चेसाठी गावापासून लगतच असणाऱ्या तेरणी गावातून मुस्लिम बांधवांना पाचारण केले जाते. मोहरमच्या निमित्ताने तेरणीतील हे मुस्लिम बांधव चार दिवस कळविकट्टे या गावी मुक्कामी जाऊन पीर देवाची पुजा करतात.
गडहिंग्लज तालुक्याच्या शेवटच्या टोकाला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वसलेले कळविकट्टे हे एक छोटेसे गाव आहे. या गावातील ग्रामस्थांची एकजूट आदर्श घेण्यासारखे आहे. गावच्या विकासासाठी व गावच्या भल्यासाठी गट तट विसरून ग्रामस्थ एकसंघ होतात. हा या गावचा इतिहास आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हे गाव प्रसिद्ध आहे.
कळविकट्टे गावातील हिंदू बांधव मोहरम हा सण मोठ्या भक्ती भावाने साजरा करतात. दरवर्षी नित्यनियमाने नवसही हिंदू बांधव फेडताना दिसतात. या निमित्य गावात करबल खेळणे, गोप रिंग करणे, चाबूक मारून घेणे, गाण्यांचा सवाल जवाब आदी कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. यंदाही मोहरम निमित्त ताबूतची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. उद्या शुक्रवारी ग्रामस्थ नवस फेडतात. शनिवारी ताबूत विसर्जनानंतर मोहरमची सांगता होणार आहे.
व्हिडिओ येथे पहा 👇🏼
श्री पिरदेव मंदिर कमिटीमध्ये अध्यक्ष महादेव पाटील, उपाध्यक्ष शशिकांत निलांजनावर, खजिनदार मलिक तेरणी, सदस्य मारुती सावंत, आप्पाजी पाटील, मारुती तेरणी, संतोष भोगुलकर, परशुराम चव्हाण, अमोल हुल्लोजी, अजय कुलकर्णी, सागर सावंत, शिवाजी पाटील, राजू गायकवाड यांचा समावेश आहे.



