Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सक्षम महिला, सुदृढ बालक आणि कुपोषणमुक्त राज्य करणार - अदिती तटकरे



मुंबई : राज्य कुपोषण मुक्त तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी युद्धस्तरावर काम करणार असल्याची ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.



दरम्यान महिलांवरील वाढत्या अत्याचारा संदर्भात महाराष्ट्र पोलीस, महिला आयोग तसेच बालहक्क आयोग, विधी व न्याय विभागाची मदत घेऊन प्राधान्याने काम केले जाईल असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. 



मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर झाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी तातडीने कामाला सुरूवात केली. 



महाराष्ट्रातील बालमृत्यू, बालविवाह, कुपोषण या समस्यांच्या निर्मूलनाबरोबरच महिलांमध्ये उद्योजकता विकसित करण्याचे काम करणार आहे. महिला व बालविकास, ICDS, बालहक्क समिती, महिला आयोग, राजमाता जिजाऊ मिशन, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून महिला व बालविकास खाते महिला व बालकांच्या सर्वांगिण विकासाचे काम करत आहे. प्रत्येक महिलेला योग्य शिक्षण, काम, पोषणासंदर्भातली माहिती, बालकांच्या विकासात पुरुषांचा सहभाग, अशा विविध मार्गांतून हा विभाग यापुढे काम करेल असा विश्वासही अदिती तटकरे यांनी व्यक्त केला. 



अंगणवाडी सेविका या महिला व बालविकास विभागाच्या राजदूत आहेत. या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बचत गट तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या समन्वयातून राज्याला एक आदर्श वाटेल अशी व्यवस्था आपण निर्माण करू. पोषण अभियानात संपूर्ण देशात राज्याने सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. यंदा ही महाराष्ट्राची कामगिरी अशीच कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही अदिती तटकरे यांनी सांगितले. 



महिला व बालविकास विभाग या अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विभागाची जबाबदारी पार पाडण्यासाठी निवड केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे नेते प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांचे अदिती तटकरे यांनी आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.