Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करणे गरजेचे : अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती किरण कुलकर्णी

                                                 (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार) 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थ्यांनी स्वत:ला सिद्ध करणे गरजेचे आहे, आयुष्यात काय करायचे आहे हे आताच ठरविणे महत्वाचे आहे. जीवनात आपण स्वप्न बघण्यासाठी कमी पडू दयायचे नाही.आपल्यातील सुप्त गुणांना वेळीच बाव देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती किरण कुलकर्णी यांनी केले.



येथील शिवराज महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सारथी, राजस्व अभियान आणि मतदार जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे होते.




प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डॉ.अण्णासाहेब हारदारे यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती किरण कुलकर्णी म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेतून करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थामार्फत पाठबळ देण्यात यावे यासाठी शासन आपल्याला आधार देत आहे, याचा लाभ सर्वांनी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून आपण भविष्यात काय करणार आहे आणि आपल्याला काय करणे शक्‍य आहे हे आजमावणे काळाची गरज आहे. आपला वेळ वाया न घालविता आपल्या अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश कधीच हुलकावणी देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी आपला संयम महत्वाचा आहे. आपल्या प्रयत्नाला बळ देणे गरजेचे आहे. असे स्पष्ट करून श्रीमती कुलकर्णी यांनी केवळ शिक्षण घेऊन चालणार नाही तर कौशल्यज्ञान असणे महत्वाचे असल्याचे सांगितले. शासनामार्फत राबवित असलेल्या योजनेचा लाभ घेऊन आपले करिअर घडावा असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. सारथी प्रकल्प अधिकारी रवींद्र पाटील महाराष्ट्र शासनामार्फत कार्यरत असणार्‍या सारथी संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक सुविधा, शिष्यवृत्ती, योजना तसेच उच्च शिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा लाभ घेण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.




तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच मतदार नोंदणी कशी करावी त्यासाठी आवश्यक प्रक्रिया, फॉर्मचे नमुने भरावायची माहिती याविषयी मार्गदर्शन करून जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करावे असे आवाहन केले. आर. के. करंबळी यांनी एम.के.सी.एल.यांच्यामार्फत विविध कोर्सेसबाबत माहिती देऊन ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा कशा पद्धतीने देण्यात येते याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.




संस्थेचे सचिव उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या देशाचे भवितव्य निवडण्याची संधी ही मतदानातून मिळते ही संधी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपली मतदार नोंदणी करावे असे आवाहन केले. तसेच शासनाच्या वतीने शिक्षणासाठी मदत करणाऱ्या सारथी, बार्टी यासारख्या संस्थेच्या माध्यमातून आपले करिअर घडविण्यासाठी प्रयत्नशील राहावे तरच आपण सर्व यशस्वी व्हाल असे स्पष्ट केले.


नायब तहसीलदार प्रशांत थोरात, मंडल अधिकारी रजनी चंदनशिवे, तलाठ अजयसिंह किल्लेदार, सचिन खवणे, राज्यशाख विभाग प्रमुख डॉ.एन.आर.कोल्हापुरे, ग्रंथपाल संदीप कुराडे, प्रा. विक्रम शिंदे, प्रा आर.डी.कमते, प्रा.दीपिका खांडेकर, प्रा.सुप्रिया मिसाळ, यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.