Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डेंग्यू ,चिकन गुनियाच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज शहरात पालिकेकडून सर्वेक्षण



गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरातील डेंग्यू , चिकन गुनियाच्या ताप सदृश्य साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नगरपरिषदेमार्फत आरोग्य विभागाकडून दैनदिन डास अळी कंटेनर सर्वेक्षण, औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात येत आहे. दिनांक १ जुलै पासून आज अखेर ६४० घरातील १९८१ कंटेनरची तपासणी करण्यात आली. या सर्वेक्षण दरम्यान १० रुग्ण तापाचे असल्याचे आढळून आले. अशी माहिती मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी दिली.




नदीवेस परिसर, मेवेकर गल्ली, शिवाजी चौक परिसर, सुतार व डोमणे गल्ली, माळी गल्ली, यशवंत पाटील बोळ, माळी गल्ली उर्वरित भाग, कुंभार बोळ, भाट बोळ, रिंग रोड या ठिकाणी डेंग्यू, चिकन गुनियाच्या ताप सदृश्य साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करण्यात आले.



सर्वेक्षणात १३ दुषित कंटेनर आढळले. आढळून आलेले कंटेनर रिकामे करून त्यामध्ये अँबीट औषध टाकण्यात आले. तसेच पाणीसाठा असणाऱ्या ठिकाणी व बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी मलेरिया ऑईल टाकण्यात आले. सर्व ठिकाणी औषध फवारणी केली व उर्वरित शहरातील भागात धूर फवारणी करण्यात येत आहे. तसेच शहरात साथरोग उद्भवू नये म्हणून शहरातील विविध भागांमध्ये घंटागाडी मार्फत ऑडीओ क्लिपद्वारे व हस्त पत्रिका वाटून नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात येत आहे.




घराजवळील परिसर स्वच्छ ठेऊन गटारीत पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या घराभोवताली निरुपयोगी पडलेल्या टायर्स, फुटक्या बाटल्या, प्लास्टिक, डबे असल्यास त्यांची तात्काळ विल्हेवाट लावावी. किटकजन्य रोगाच्या डासांची उत्पत्ती ही स्वच्छ साठवलेल्या पाण्यात होत असल्यामुळे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा. असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी खारगे यांनी गडहिंग्लज शहरातील नागरिकांना केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.