Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ऑनलाईन शासकीय गोंधळ..! चुकीची केवायसी भरल्याने पीएम किसान योजनेसाठी हलकर्णीतील शंभर शेतकरी अपात्र

हलकर्णी ऐवजी आंबेवाडी असा चुकीचा उल्लेख


 मनसेच्या वतीने आंदोलनाचा इशारा 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): पी.एम.किसान योजने अंतर्गत लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवाना ऑनलाईन शासकीय गोंधळात चुकीच्या पध्दतीने अपात्र  करण्यात आले असून तातडीने हे दुरुस्त करून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष शिवानंद मठपती यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.




या निवेदनात म्हटले आहे की,  पी.एम.किसान योजनचे हलकर्णी तसेच तालुक्यातील हजारो लाभार्थी शेतकरी बांधव यांना वेळोवेळी वेगवेगळया अटी शर्ती देऊन ऑनलाईन केवायसी करण्यास केंद्र तसेच राज्य शासनाकडून सांगण्यात आले. हे करत असताना शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून चुकीची माहिती भरली गेली. हलकर्णी गावातील लाभार्थ्यांच्या गावांचे नावच बदलून आजरा तालुक्यातील आंबेवाडी करण्यात आले. चुकीच्या केवायसीमुळे जवळजवळ १०० लाभार्थी हे अपात्र झाले आहेत. याची शासकीय स्तरावर पुन्हा पात्र करण्याची प्रकिया जरी सुरू असली तरी निदर्शनास न आलेले कित्येक लाभार्थी शासकीय दरवाजांवरती चकरा मारत आहेत. योग्य मार्गदर्शन देण्याची जबाबदारी कृषी सहाय्यक व कृषी विभागातील अधिकारी यांच्यावर दिलेली आहे. पण हलकर्णी सारख्या ग्रामीण भागात शेतीचे मोठे क्षेत्र असताना केवळ एका कृषी सहाय्यकावर तेरा गावांचा अतिरिक्‍त भार दिला आहे. आठवडयामध्ये एक जरी गाव करायचे म्हटले तरी ते शक्य नाही. पात्र-अपात्र या फेऱ्यात अडकलेल्या पी.एम. किसान योजनेच्या शेतकऱ्यांना आजपर्यंतचा न मिळालेला योजनांचा लाभ मिळावा तसेच अपात्रतेची टांगती तलवार दूर व्हावी. अन्यथा मनसेच्या वतीने  आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.



या निवेदनावर मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, तालुकाध्यक्ष शिवानंद मठपती, शहराध्यक्ष केंप्पांना कोरी यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.