Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज नगरपरिषदेतर्फे शहर उपजीविका केंद्राचे उदघाटन

                                                   (छायाचित्र मज्जिद किल्लेदार) 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): नगरपरिषदेकडील दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान विभागा अंतर्गत स्थापन करणेत आलेल्या शहर उपजीविका केंद्राचे उदघाटन नगरपरिषदेचे सहा.कार्यालयीन अधीक्षक ओमकार बजागे, सचिन कांबळे, जिल्हा समन्वयक महिला आर्थिक विकास महामंडळ, कोल्हापूर तसेच बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गडहिंग्लजचे शाखाधिकारी भूषण भगुल, तेजस्विनी शहरस्तरीय संस्थेच्या अध्यक्षा सौ.मनीषा गंधवाले, सचिव शिल्पा मंगसुळे, वाचनालय विभाग प्रमुख काकासाहेब भुईबर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.




गडहिंग्लज नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राची स्थापना झाली आहे. प्रारंभी क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अभियानाचे सहा.प्रकल्प अधिकारी जयवंत वरपे यांनी केले. यामध्ये त्यांनी शहर उपजीविका केंद्राची संकल्पना आणि उद्देश स्पष्ट केला. शहर उपजीविका केंद्राअंतर्गत शहरी गरीब त्यांच्या सेवा आणि वस्तू संघटीत आणि विश्वनीय पद्धतीने शहरामध्ये आवश्यक व्यक्तींना उपलब्ध करून देऊ शकतील. उपजीविका केंद्र हे शहरी गरीब उत्पादक व ग्राहक यांना जोडणारा दुवा असेल तसेच वस्तू व सेवा यांची मागणी व पुरवठा जोडण्याचे काम करेल. शहरी गरीबांना माहिती आणि व्यवसाय संबंधी आवश्यक ते सर्व सहाय्य व सेवा मिळतील असा मुळ उद्देश या केंद्राचा असेल अशी माहिती श्री वरपे यांनी दिली. या केंद्राच्या माध्यामातून अल्पदराने विविध सेवा-सुविधा, ऑनलाईन अर्ज भरणे, कलर झेरॉक्स, लॅमिनेशन याबरोबरच महिलांनी उत्पादित केलेल्या मालासाठी विक्री केंद्र म्हणून सुद्धा याचा वापर करता येईल असे त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले. आतापर्यंत अभियानाच्या माध्यमातून शहरामध्ये बचत गटातील महिलाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी राबविलेल्या विविध उपाययोजनाची माहितीही यावेळी देण्यात आली.




महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सचिन कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना बचतगट हे महिलांचे आर्थिक उन्नतीचे साधन असून त्यामध्ये सर्व महिलांनी सामुहिक जबाबदारीने व विश्वासाने एकत्र राहिले पाहिजे.बचत गटांच्या नियमावलीचे पालन केले पाहिजे असे मत व्यक्त केले.



सहा.कार्यालयीन अधीक्षक ओमकार बजागे यांनी या केंद्रा विषयी माहिती देताना हे केंद्र सुपर मार्केट येथील दुसर्‍या मजल्यावर स्थापन केले असून यासाठी गडहिंग्लज नगरपरिषदेने १००० चौ.फु. जागा उपलब्ध करून दिली आहे. नगरपरिषदे मार्फत विविध शासकीय योजना, अभियाने उत्तम प्रकारे राबविली जात असून नगरपरिषदेकडील दि.अं.यो-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान हा विभाग सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे सांगितले. शहरातील अधिकाधिक महिलांनी या केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुदाय संघटक संदीपकुमार कूपटे यांनी केले. कार्यक्रम पार पाडणेसाठी सौ. मीनाक्षी मोळदी, कु.पूजा सोलापुरे, विशाल रोटे, आकाश सातवेकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी शहरातील बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार सौ.विद्याश्री कांबळे यांनी मानले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.