Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बेरोजगार डी.एड, बी.एड धारकांचे आजऱ्यात शुक्रवारी धरणे आंदोलन



आजरा : शिक्षकांच्या रिक्त पदावर सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक न करता नव्या शिक्षकांची भरती करण्यात यावी या मागणीसाठी पालक, शिक्षक, बेरोजगार डी.एड, बी.एड धारक संघटनेच्या वतीने शुक्रवार दिनांक २१ जुलै रोजी  आजरा येथील पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिली. या आंदोलनासंदर्भात  गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.




या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकांची जवळपास 60 हजार पदे रिक्त आहेत. बरीच वर्ष भरती केली नसल्याने कार्यरत शिक्षकांच्याकडून कामे करून घेतली जात आहेत. त्याचा परिणाम कार्यरत शिक्षकांच्या मानसिकतेवर होत असून मुलांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर देखील फार मोठा परिणाम होत आहे. शिक्षक भरती होणार या आशेवर डी.एड, बी.एड्‌ धारक  आहेत. दोन महिन्यापूर्वी शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली आहे. तीस हजार पदे भरण्याची घोषणा देखील झाली आहे. मात्र मध्येच सेवानिवृत्त शिक्षकांना 20 हजार मानधनावर घेऊन भरती पुढे ढकलण्याचा डाव आखला जात आहे. राजकीय अस्थिरतेमुळे असे निर्णय घेऊन सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीपासून वंचित ठेवले जात आहे, हे योग्य नाही. गेली १०-१२ वर्षे शिक्षक भरतीच शासनाने न केल्याने अनेक डी.एड, बी.एड्‌ धारकांचे भरती होण्याचे वय निघून गेले आहे तर कांहीं एज बार होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शिक्षक भरती होणे गरजेचे आहे.



राज्यात सध्या दिड ते दोन लाख टी.ई.टी व अभियोग्यता पात्रता धारक बेरोजगार तरुण शिक्षक तयार असताना सेवानिवृत्त शिक्षकांना कामावर घेऊन सरकार काय साध्य करणार आहे? जेणेकरून पेन्शन धारकांना पुन्हा रोजगार देऊन नव्या उमेदीच्या भावी शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबीयांना रोजगारा पासून रोखत आहेत हे योग्य नाही. निवृत्त शिक्षकांना पुन्हा कामावर घेऊन त्यांच्या शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याने ते पूर्वीसारखे अध्यापन करू शकणार नाहीत त्याचा परिणाम मुलांच्या गुणवत्तेवर होणार आहे. शाळा बंद पाडण्याचा शासनाचा विचार आहे का? एकीकडे कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा घाट तर दुसरीकडे नव्या शिक्षकांना रोखण्याचा डाव या सर्व गोष्टी खाजगीकरणाला खतपाणी घालणाऱ्या आहेत. या कृतीला जनतेचा विरोध आहे. जर निवृत्त शिक्षकांना पुन्हा संधी दिल्यास किंवा ग्रामीण भागातील शाळा बंद केल्यास मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी शाळा बंद आंदोलन सुरू केले जाईल. निवृत्त शिक्षकांना पुन्हा कामावर घेण्याच्या निर्णयाला पालक, शिक्षक, विद्यार्थी व डी.एड. बी.एड धारक बेरोजगार यांचा तीव्र विरोध राहील याची नोंद घ्यावी. 



निवृत्त शिक्षकांना घेण्याचा निर्णय रद्द करावा, ग्रामीण भागातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करु नयेत व नवीन शिक्षक भरती तातडीने करावी या मागण्यांसाठी पंचायत समिती आजरा  कार्यालयासमोर दिनांक धरणे आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. या आंदोलनात बेरोजगार डी.एड, बी.एड धारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.