चिमुकल्यांनी मराठी -हिंदी गीतावर नृत्य व गीत सादर करून प्रेक्षकांची जिंकली मने
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समुह संचलित जयभारत इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रशांत शिंदे व उपसरपंच संदीप कोकितकर हे उपस्थित होते.
स्वागत व प्रस्ताविक मुख्याध्यापिका सुकेशिनी कांबळे यांनी करून हायस्कूल मधील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांचे यश यांचा आढावा घेतला. प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षीय भाषणातून ॲड. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा देण्यासाठी संस्था बांधील असून या सुविधाचा फायदा विद्यार्थ्यांनी घेऊन गुणवत्ता वाढीला प्राधान्य दिला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी चिमुकल्यानी मराठी व हिंदी गीतावर नृत्य व गीत सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. प्रामुख्याने यामध्ये लावणी, पारंपारिक गीते, कोळीगीते, लोकधारा व नाटीकाचे सादरीकरण करीत उपस्थिताची दाद मिळवली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतीक विभाग प्रमुख सविता शेणवी, दिपा कानडे यांनी तर संस्थाध्यक्ष ॲड.डॉ.आण्णासाहेब चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ.यशवंत चव्हाण यांचे प्रोत्साहन लाभले.
यावेळी विठ्ठल आसवले, सखाराम भोसले, बाळकू शिंदे, सुभाष चव्हाण, बाळासाहेब धरणगुत्ती, अर्जुन दिवटे, सुरज आसवले सह विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश होळ यांनी तर आभार मुख्याध्यापिका पूनम पाटील यांनी मानले.


