आजरा : आजरा तहसील कार्यालयात नुकताच ग्राहक दिन साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय आजरा, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक कल्याण फाउंडेशन यांच्या वतीने सदरचा ग्राहक दिन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार समीर माने होते.
स्वागत तलाठी वंदना शिंदे यांनी केले. यावेळी तहसीलदार श्री. माने म्हणाले, ग्राहक संरक्षण कायदा अभ्यासणे काळाची गरज असून अनेक फसव्या जाहिराती, ऑनलाइन खरेदी विक्री व्यवहार यामध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहक कायदा, सायबर कायदा अभ्यासणे गरजेचे आहे.
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे जिल्हा विभाग प्रमुख शिवाजी गुरव म्हणाले, वास्तविक वीज मंडळ, एस.टी. महामंडळ, भूमी अभिलेख कार्यालय, बँक प्रतिनिधी या सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करणे गरजेचे होते. सर्व विभागाची एक व्यापक बैठक बोलावून ग्राहक कायद्यावर चर्चा करावी व ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहकांच्या समस्या समजून घ्याव्यात अशी मागणी केली.
ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अरुण यादव यांनी ग्राहक संरक्षण कायदा 2019 या विषयावर मांडणी केली. यावेळी ग्राहक चळवळीचे दत्ता देशपांडे, चंद्रकांत देसाई, ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष महादेव सुतार, सुमन कांबळे यांच्यासह कार्यकर्ते व पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. आभार नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी मानले.




