राष्ट्रपतींच्या उपस्थितीत करण्यात आला सन्मान
नवी दिल्ली : माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये गडहिंग्लज नगरपरिषदने भारताच्या पश्चिम विभागात "सर्वात स्वच्छ शहर" हा बहुमान मिळविला आहे.
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु व केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या उपस्थितीत झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात गडहिंग्लज नगरपरिषद मार्फत प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरूप खारगे, अनिल गंदमवाड, प्रशांत शिवणे व रवीनंदन जाधव यांनी हा सन्मान स्वीकारला.
देशातून एकूण ४४४७ शहरांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये सहभाग नोंदविला होता. गडहिंग्लज नगरपरिषदेने देशात ६ वा क्रमांक पटकावला आहे. गडहिंग्लज नगरपरिषदेला GFC स्टार रेटिंगमध्ये तीन स्टार दर्जा मिळाला आहे. तसेच ODF++ हा दर्जा मिळाला आहे. या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील एकूण ५ नगरपरिषदा व ३ महानगरपालिकांचा समावेश होता.
या यशात सर्व घटकांचे बहुमूल्य योगदान : मुख्याधिकारी स्वरूप खारगे
या सातत्यपूर्ण यशात गडहिंग्लज येथील नागरिक, सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संस्था, तरुण मंडळे, पत्रकार बांधव व सर्वात महत्वाचे म्हणजे नगरपरिषदमधील सफाईमित्र व संपूर्ण कर्मचारी वर्ग यांचे बहुमूल्य योगदान असल्याचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी सांगितले.




