लेझीम, भजन व धनगरी ढोल वादनाने गावातील वातावरण भक्तीमय
राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): अयोध्याहून आलेल्या मंगल अक्षता कलशाची तेरणीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. लेझीम, भजन, धनगरी ढोल वादनच्या गजरात ही शोभायात्रा निघाली.
अयोध्या येथे २२ जानेवारीला श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे. या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे यासाठी आमंत्रण घेऊन हा मंगल अक्षता कलश देशभरातील प्रत्येक गावात नेण्यात येत आहे. या मंगल अक्षता कलशाद्वारे देशातील प्रत्येक गावातील नागरिकांना आमंत्रण देण्यात येत आहे.
हसुरवाडी येथील महिला लेझीम पथकाच्या गजरात ही शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी सहाच्या दरम्यान मंगल अक्षता कलशाचे आगमन गावात झाले. येथील श्री हनुमान मंदिर येथे या अक्षता कलशाचे पूजन उदय हिरेमठ यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर फुलांनी सजवलेल्या व प्रभू श्री रामचंद्र यांची प्रतिमा असलेल्या रथातून या मंगल अक्षता कलशाचे बस स्टँड परिसरात आगमन झाले. त्यानंतर संगमेश्वर चौक, महालक्ष्मी पतसंस्था, बलभीम दूध संस्था मार्गे सदाशिव अगसगी यांच्या गल्लीतून पुढे अरुणराव देसाई यांच्या निवासस्थानाकडून बागवान स्टॉप येथे मिरवणुकीने रथ आला. येथून पुढे बसवेश्वर गल्ली मार्गे महालक्ष्मी मंदिराकडे हा रथ मार्गस्थ झाला. या ठिकाणी रात्री अकरा वाजता शोभायात्रेची सांगता करण्यात आली. या मिरवणुकीत गावातील विविध पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. भगवे झेंडे व भक्तांनी डोक्यावर घातलेल्या भगव्या टोप्यांमुळे गावातील वातावरण भक्तिमय बनले होते.



