सचिवाकडील पैसे लुटी प्रकरणातील आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा झाल्याने व्यक्त केले समाधान
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बुगडीकट्टी येथील महालक्ष्मी दूध संस्थेच्या सचिवाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडील दूध बिलाची रक्कम लुटणाऱ्या चौघांना सात वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा गडहिंग्लजच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकतीच सुनावली आहे. या खटल्यात सरकारी वकील ॲड. सुनील तेली यांनी केलेला युक्तिवाद महत्वपूर्ण ठरला आहे. या पार्श्वभूमीवर बुगडीकट्टी येथील सरपंच दयानंद देसाई यांच्यासह गावातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारी वकील ॲड.सुनील तेली यांचा सत्कार करत आभार मानले. २२ डिसेंबर २०१७ रोजी लिंगनूर-मुंगूरवाडी मार्गावर ही घटना घडली होती.
बुगडीकट्टी येथील महालक्ष्मी दूध संस्थेचे सचिव चाळू महादेव राजगोळे व दत्तू पाटील हे संस्थेचे दूध बिल देण्यासाठी हेब्बाळ जलद्याळ येथील बँकेतून ३ लाख ७० हजार रुपये काढले होते. घेऊन येताना सचिवाच्या मोटारसायकलला धक्का मारून त्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकण्यात आली होती. त्यांच्याकडील सदर रक्कम लुटून नेण्यात आले होते. या खटल्यात सरकारतर्फे ॲड. सुनील तेली यांनी काम पाहिले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने या खटल्यातील आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने दिलेल्या निकालाबद्दल बुगडीकट्टी येथील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. न्यायालयात जाऊन सरकारी वकील ॲड. सुनील तेली यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी सरपंच दयानंद देसाई, हनुमान दूध संस्थेचे चेअरमन जोतिबा हुबळे, महालक्ष्मी दूध संस्थेचे चेअरमन आप्पासाहेब पाटील, ब्रह्मदेव दूध संस्थेचे विठ्ठल राजगोळे, लक्ष्मी सेवा संस्थेचे चाळू राजगोळे, दत्तू पाटील उपस्थित होते.

