गडहिंग्लज (प्रतिनिधी): शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श योजनेअंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या अभियानात पंचायत समितीच्या केंद्र स्तरीय मूल्यांकन समितीमार्फत मूल्यांकन करण्यात आले. गडहिंग्लज तालुक्यातील अकरा केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मूल्यांकन करून दोन्ही गटातून अकरा शाळांची निवड करण्यात आली आहे. आता या दोन्ही गटातून तालुकास्तरीय मूल्यांकन करून प्रत्येक गटातील तीन शाळांची निवड केली जाणार आहे.
यामध्ये प्राथमिक विभागात कडगाव केंद्र- विद्या मंदिर लिंगनूर क. नूल, बेळगुंदी केंद्र - विद्या मंदिर, ऐनापूर, भडगाव केंद्र- केंद्र शाळा, भडगाव, महागाव केंद्र - विद्या मंदिर. मासेवाडी, नेसरी केंद्र-विद्या मंदिर सरोळी, हडलगे केंद्र-विद्या मंदिर यमेहड्डी, हिडदुग्गी केंद्र-विद्या मंदिर, बुगडीकट्टे, हलकर्णी केंद्र-विद्या मंदिर, इरगुच्ची, नूल केंद्र-विद्या मंदिर नांगनूर, हेब्बाळ केंद्र-विद्या मंदिर कन्या हेब्बाळ, नगरपालिका गडहिंग्लज केंद्र-एम आर हायस्कूल, गडहिंग्लज.
माध्यमिक गटात कडगाव केंद्र- क्रिएटिव्ह स्कूल, बडयाचीवाडी, बेळगुंदी केंद्र- न्यू.इंग्लिश स्कूल, कौलगे, भडगाव केंद्र- न्यू होरायझन स्कूल, औरनाळ, महागाव केंद्र-महात्मा फुले विद्यालय महागाव, नेसरी केंद्र- एस.एस. हायस्कूल, नेसरी, हडलगे केंद्र- रवळनाथ विद्यालय, कुमरी, हिडदुग्गी केंद्र- हिडदुग्गी हायस्कूल, हिडदुग्गी, हलकर्णी केंद्र -हलकर्णी भाग हायस्कूल, हलकर्णी, नूल केंद्र-न्यू इंग्लिश स्कूल, नूल, हेब्बाळ केंद्र - एस.डी.हायस्कूल, मुत्नाळ, नगरपालिका गडहिंग्लज केंद्र- जागृती हायस्कूल, गडहिंग्लज या शाळांची निवड करण्यात आली आहे.
या शाळांची प्रत्येक केंद्रातून निवड करण्यात आली. यामध्ये विद्यार्थी केंद्रीत उपक्रमांचे आयोजन व विद्यार्थी सहभाग ६० गुण तर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा समावेश ४० गुण असे शंभर गुणांचे मूल्यांकन करण्यात आले. निवड झालेल्या शाळांचे तालुकास्तरीय मूल्यांकन सुरू आहे. तालुकास्तरावर अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकांना एक लाख, दोन लाख, तीन लाख दिले जाणार आहे.
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळामधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्यात सन २०२०-२१ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना ही पूर्णतः राज्य पुरस्कृत योजना राबवण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत आतापर्यंत केवळ भौतीक सुविधांचे निर्माण या घटकाअंतर्गत लहान व मोठी बांधकामे याच बाबीकडे लक्ष देण्यात आले आहे. या अभियानाचा अधिक प्रभावी विस्तार होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्ता अध्ययन अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास अशा अनेकविध घटकांचा अंतर्भाव होणे आवश्यक झाले आहे. या घटकांना योग्य त्याप्रमाणात प्राधान्य दिल्यास शाळेचा सर्वांगीण विकास साधता येतो. या घटकांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या व्हावी यासाठी शाळांनी आपापसात स्पर्धा करणे हा त्यासाठीचा सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" हे अभियान दि. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ (४५ दिवस) या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांचे १०० गुणापैकी मूल्यांकन करण्यात आले.
प्रत्येक केंद्रातून स्थानिक स्वराज्य संस्था व इतर व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीतून प्रत्येकी एक शाळा स्वतंत्रपणे निवडण्यात आले. केंद्रस्तरावर निवड झालेल्या शाळांमधून तालुकास्तरावरील दोन्ही वर्गवारीतून स्वतंत्रपणे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाची शाळा निवडले जाणार आहेत. याच पद्धतीने जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाच्या शाळा निवडण्यात येणार आहेत निवड झालेल्या शाळांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. तालुकास्तर - प्रथम 3 लाख, द्वितीय 2 लाख, तृतीय 1 लाख रुपये. जिल्हास्तर - प्रथम 11 लाख, द्वितीय 5 लाख, तृतीय 3 लाख रुपये. विभागस्तर - प्रथम 21 लाख, द्वितीय 11 लाख, तृतीय 7 लाख रुपये. राज्यस्तर- प्रथम 51 लाख, द्वितीय 21 लाख, तृतीय 11 लाख रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
या अभियानामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील सर्व २३७ शाळांनी असून १०० टक्के शाळांनी सहभाग नोंदविला आहे. गटविकास अधिकारी शरद मगर, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मूल्यांकन सुरू आहे.

