Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज शहरातील वाहतुकीचे योग्य पद्धतीने नियोजन करा!

श्री काळभैरी यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे पक्ष शिवसेनेच्या वतीने मागणी


जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी यांना निवेदन 


अन्यथा आंदोलन छेडण्याचा दिला इशारा 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री. काळभैरव यात्रेच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज शहरातील वाहतुकीचे नियोजन प्रशासनाने तातडीने करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.



या निवेदनात म्हटले आहे की, श्री. काळभैरव देवाची यात्रा दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पार पडत आहे. या यात्रेसाठी भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होत असतो. दरवर्षी यात्रेपूर्वी नियोजन बैठक घेऊन वाहतूक, सुरक्षा व्यवस्था याचे नियोजन केले जाते. मात्र यंदा गडहिंग्लज शहरात संकेश्वर-बांदा महामार्गाचे काम सुरू आहे. रस्त्याची खुदाई करण्यात आल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ठेकेदार कंपनी या रस्त्याचे काम युद्धपातळीवर करत आहे. रात्रंदिवस परप्रांतीय कामगार राबत आहेत. यामध्ये काही शंकाच नाही. मात्र महामार्गाचे काम शहरात सुरू होण्यापूर्वी पालिका प्रशासन, शासकीय यंत्रणांनी पर्यायी मार्गाचा शोध घेणे गरजेचे होते. या नियोजनाकडे कानाडोळा झाल्याचे दिसून आले. वाहन कोंडी सोडवण्यासाठी पोलीस यंत्रणेने देखील गांभीर्याने घेतलेले दिसले नाही. शहरातून येणाऱ्या रुग्णवाहिकांना देखील याचा मोठा फटका बसल्याचे दिसून आले. वाहतुकीच्या या समस्येवर ठाकरे पक्ष शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर प्रशासनाला जाग आली. त्यानंतर या वाहन कोंडीवर पर्याय म्हणून संकेश्वर मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. 



सध्या गडहिंग्लज शहरातील रिंग रोड अस्तित्वात नाही. त्यामुळे शहरातील महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना मोठे हाल सोसावे लागणार आहेत. श्री काळभैरव यात्रेमुळे गडहिंग्लजकडे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे. यात्रेच्या अनुषंगाने प्रशासनाने बैठक आयोजित करून नियोजना संदर्भात आढावा घेतला आहे. मात्र पोलीस व पालिका प्रशासनाकडून वाहतूक नियोजनाबाबत अद्याप काही हालचाली केलेल्या दिसत नाहीत. यात्रेकरूंसाठी  गडहिंग्लज आगाराकडून जादा गाड्यांचे देखील नियोजन करण्यात आले आहे. असे असले तरी सध्या या एसटी बसेसना बसस्थानकापासून उपलब्ध पर्याय मार्गावरून शहराबाहेर पडताना नाकीनऊ होत आहेत. यात्रेदरम्यान तर जादा बसेसना या वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे वाहतुकीची ही समस्या जटिल बनणार आहे. शहरा बाहेरून येणाऱ्या वाहनधारकांना शहरातील वाहतुकीची माहिती नसल्याने ते भरकटू शकतात. त्यामुळे वाहतूक आणखी विस्कळीत बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात प्रशासनाने वाहतुकीचे योग्य पद्धतीने नियोजन करून यात्रा सुरळीतपणे पार पाडण्याची गरज आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास त्रासमुक्त होण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. योग्य पद्धतीने वाहतुकीचे नियोजन न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.




या निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, तालुकाप्रमुख दिलीप माने, शहर प्रमुख संतोष चिकोडे, प्रतीक क्षीरसागर, दिगंबर पाटील, सुधाकर जगताप, संभाजी येरुडकर, विनायक पाटील, राजू परीट, कृष्णात कांबळे, पांडुरंग केसरकर, केदार डांग, रवी पाटील, श्रीशैल साखरे, सुरेश शेंडगे, वसंत नाईक, काशिनाथ गडकरी, सुरेश हेब्बाळे, संदीप चव्हाण, मल्लिकार्जुन चौगुले, आप्पासो कांबळे, राजू रेडेकर आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.