अधिकारी व पदाधिकारी संयुक्त बैठकीत घेण्यात आला निर्णय
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लजचे ग्रामदैवत व महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री. काळभैरव देवाची यात्रा सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी होत आहे. यंदाची ही यात्रा डिजिटल फलक व गुलालमुक्त साजरा करण्याचा निर्णय संयुक्त बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे होते.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासंदर्भात अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यात्रेच्या निमित्ताने अनावश्यक ठिकाणी फलक व कमानी लावण्यात येऊ नयेत, गुलालाचा वापर उधळण्यासाठी न करता लावण्यासाठी करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले. यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात यावे. सध्या शहरात महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे पालखी जात असलेल्या वीरशैव बँकेच्या कोपऱ्यावरील काम हे यात्रेपूर्वी पूर्ण करावे, पालखी मार्ग खड्डेमुक्त करण्यात यावा आदी सूचना प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिल्या. त्याबरोबरच मंदिर परिसरात स्वच्छतागृह, पिण्यासाठी पाणी, रस्ते, वाहतुकीचे नियोजन योग्य प्रकारे करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. भाविकांना यात्रास्थळी जाण्यासाठी गडहिंग्लज आगाराच्यावतीने जादा गाड्यांची सोय करण्यात आल्याचे आगारप्रमुख गुरुनाथ रणे यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार ऋषिकेत शेळके, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी संजय गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीता कोरे, पोलीस निरीक्षक गजानन सरगर, सरपंच बाजीराव खोत, उपसरपंच रवी बनगे, चंद्रकांत सावंत, नागेश चौगुले, मारुती राक्षे, मारुती खोत, सुधीर पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.

