ठाकरे पक्ष शिवसेनेच्या वतीने कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण महामंडळाला निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ताम्रपर्णी, तिलारी, घटप्रभा, हिरण्यकेशी, दूधगंगा, वेदगंगा या नद्या प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) वतीने कोल्हापूर येथील प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, नद्यांमधील पाण्याला हिरवा रंग, दुर्गंधी, तेलयुक्त तवंग येणे, जलपर्णी व शेवाळ वाढणे, रासायनिक घटक मिसळत असल्याचे दिसून येत आहे. तसेच साखर कारखान्यांकडून सोडण्यात येणारे सांडपाणी थेट नद्यांमध्ये सोडले जात असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. निर्माल्य, रक्षा, केस, चिकन- मटन शॉप मधील कचरा नद्यांमध्ये टाकण्यावर निर्बंध घालावेत. प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांना जलजन्य आजार उद्भवत आहेत. त्यातच यावर्षी पाऊसमान कमी झाल्याने या पाणी प्रदूषणाची तीव्रता आणखी वाढली आहे. त्यामुळे नद्यांमधील या पाणी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाप्रमुख श्री. शिंत्रे यांनी या निवेदनातून केली आहे.

