आज सायंकाळी पार पडणार शहरात पालखी सोहळा
उद्या डोंगरावरील मंदिरात पार पडणार यात्रा
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरव यात्रा उद्या दिनांक २६ रोजी (सोमवारी) होत आहे. आज सायंकाळी शहरातील श्री काळभैरव मंदिरातून सायंकाळी चार वाजता पालखी सोहळा पार पडणार आहे. मिरवणुकीने पालखी डोंगराकडे रवाना होणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. तसे आदेश उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी काढले आहेत. हा बदल आज (रविवार) रात्री दहा ते उद्या सोमवारी रात्री दहापर्यंत राहणार आहे.
वाहतूक मार्गात केलेला बदल पुढील प्रमाणे : कोल्हापूरकडून काळभैरीमार्गे येणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ती सनराईस हॉटेल, बहिरेवाडी, वडरगे गावातून वडरगे रोडने गडहिंग्लजकडे. तसचे गडहिंग्लजमार्गे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक लाखेनगर कमान, शेंद्री, हनिमनाळ, हिटणीमार्गे कोल्हापूरकडे वळविली जाणार आहे. त्याबरोबरच एकेरी मार्गांचाही वापर केला जाणार आहे. गडहिंग्लजमार्गे काळभैरव मंदिराकडे जाणारी वाहने वीरशैव चौक, हनुमान मंदिर, काळभैरी कमान, भैरी रोड, बड्याचीवाडी फाटा येथे जातील. या ठिकाणी एमआयडीसीत वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. परत जाण्यासाठी एमआयडीसी, केदारी रेडेकर रुग्णालय, शेंद्री रोड, औरनाळ फाटा, औरनाळ गावातून संकेश्वरकडे, तसेच मेटाचा मार्ग, कचरा डेपो, होंडा शोरुमकडून गडहिंग्लजकडे अशी एकेरी वाहतूक राहणार आहे. वाहतूक कोंडी कमी होऊन भाविकांचा प्रवास त्रास मुक्त होण्याच्या दृष्टीने हे वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.

