शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन 'प्रतिबिंब २०२४' संपन्न
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाची योग्य सांगड घालून आपल्या करिअरचे पंख बळकट करणे आवश्यक आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आपण ज्ञानाने समृध्द होण्यासाठी सृजनशीलता अंगी बाळगणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सौ. गंधालीदेवी कुपेकर यांनी केले. येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन 'प्रतिबिंब २०२४' या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी स्वागत करून प्रास्ताविकात फार्मसीच्या विविध उपक्रमाचा आढावा घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना सौ. कुपेकर म्हणाल्या, आज तरुण सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपल्या करिअरमध्ये प्रगती करण्यास खूप संधी उपलब्ध आहेत, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे. प्राचीन काळी आपल्या भारतातील नालंदा विद्यापीठ त्याकाळी संपूर्ण जगभर प्रसिद्ध होते त्याची ख्याती आजही कायम आहे. ज्ञानसमृद्धीचा वारसा आपल्या देशामध्ये होता. या ज्ञानाचे पाईक बनून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचा मार्ग सुकर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना फार्मसी हे आजच्या काळात अत्यंत महत्वाची विद्याशाखा आहे. या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी करिअर करण्याबरोबरच समाजशील कार्याचा वारसा जपणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. यावेळी संस्था उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, साहित्यिक के. जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास हडलगेचे सरपंच हणमंत पाटील, प्रा.विश्वजित कुराडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अनघा पाटील, प्रा. स्नेहल दळवी, संस्थेचे अन्य मान्यवर, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनीषा जाधव यांनी केले. आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अनघा पाटील यांनी मानले.

