विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांची पत्रकार परिषदेत माहिती
गडहिंग्लज (प्रतिनिधी): माजी आमदार डॉ. एस. एस.घाळी यांच्या पत्नी आणि विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष कै. रत्नमाला घाळी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त दिला जाणारा कै रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार डॉ. नंदाताई बाभुळकर यांना जाहीर करण्यात आला. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गडहिंग्लजचे माजी आमदार डॉ. एस. एस. घाळी यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती. विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील मुलांचा शिक्षणाचा प्रश्न सोडवला होता. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गडहिंग्लज आणि परिसराला विकासाचा नवा चेहरा त्यांनी प्राप्त करून दिला. 1986 साली डॉ. घाळी यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे कार्य खंबीरपणे पुढे नेणाऱ्या महनीय कै. रत्नमाला घाळी वहिनींचा उल्लेख केला जातो.
गडहिंग्लजच्या शैक्षणिक दालनातील एक महत्त्वाचे द्वार म्हणून विद्या प्रसारक मंडळाला ओळखले जाते. के.जी. टू पी.जी. आणि अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमासंदर्भात संस्थेला अग्रेसर करण्यात घाळीवहिनींचा वाटा मोठा आहे. याबरोबर श्री वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँक, गांधीनगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यासारख्या कितीतरी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहकार लोकाभिमुख केला. समाजाशी कायमपणे नाळ जोडून 'निराधारांचा आधार' या न्यायाने सामाजिक बांधिलकी पत्करली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी व त्यांच्या स्वावलंबनासाठी ज्ञानाची, सहकार्याची आणि आधाराची कवाडे सतत उघडी ठेवली. गडहिंग्लज नगरपरिषदेच्या नगरसेविका, काँग्रेस कमिटीच्या कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा यासारख्या पदावर काम करताना राजकारणाला समाजकारणाची जोड त्यांनी दिली. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला अनेक सन्मान आणि पुरस्काराननी गौरविले आहे. त्यांच्या या कार्याचा वसा आणि वारसा चिंरंतन राहावा यासाठी त्यांच्या हयातीमध्येच दरवर्षी रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार दिला जात होता. यापूर्वी नसिमा हुरजूक, प्रा. डॉ. साधना झाडबुके आणि श्रीमती शोभाताई कोरे यांना या पुरस्काराने गौरविले आहे.
रत्नमाला घाळी यांच्या पश्चात त्यांच्या स्मृतिदिनी आता हा पुरस्कार विद्या प्रसारक मंडळ आणि जागृती हायस्कूल माजी विद्यार्थी संघटने मार्फत दिला जाणार असल्याची माहिती सतीश घाळी यांनी दिली. यावर्षीचा रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे माजी सभापती कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ नंदाताई बाभुळकर यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख 25 हजार रुपये, मानपत्र सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार कोल्हापूरच्या मधुरिमाराजे यांच्या हस्ते 18 फेब्रुवारी रोजी डॉ घाळी सभागृह येथे 3 वाजता दिला जाणार आहे . या कार्यक्रमासाठी परमपूज्य बसवकिरण स्वामीजी, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती विद्या डॉ सतीश घाळी यांनी दिली.
यावेळी संस्थेचे सचिव बी जी भोसकी सहसचिव गजेंद्र बंदी ,संचालक किशोर हंजी, ॲड. विकास पाटील, संगप्पाना दड्डी, महेश घाळी, डॉ शिवकुमार कोल्हापुरे, प्राचार्य शिवानंद मस्ती, सुशांत घाळी उपस्थित होते.

