Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निरोगी व आनंदी आयुष्यासाठी नेहमी हसत रहावे!

निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर यांचा नागरिकांना कानमंत्र


महागाव येथे ओम गणेश भक्ती सेवा ट्रस्टच्या वतीने कार्यक्रम संपन्न 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): माणसांनी हिंमतीने व हसत खेळत जगले पाहिजे. युवा वर्गाने भरपूर जेवण व व्यायामाकडे लक्ष द्यावे. शरीरात कॅन्सरचा जंतू निर्माण होऊ नये यासाठी पौष्टीक आहार घेणे गरजेचे आहे. निरोगी व आनंदी जीवन जगण्यासाठी नेहमी हसत राहिले पाहिजे असा निरोगी आरोग्याचा कानमंत्र निसर्गोपचार तज्ज्ञ व सुप्रसिद्ध व्याख्याते स्वागत तोडकर यांनी नागरिकांना दिला.



महागाव येथील ओम गणेश भक्ती सेवा ट्रस्टच्या वतीने श्री गणेश जयंतीनिमित्त आयोजित 'औषधा विना उपचार' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ओमगणेश भक्ती सेवा ट्रस्टचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी व्हा.चेअरमन अप्पी उर्फ विनायक पाटील होते. यावेळी सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच संदिप कोकितकर, राजू खमलेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी ६ पासून अथर्वशीर्ष अभिषेक, वरदविनायक पूजा व रुद्राभिषेक, होम हवन पूजन, पालकी मिरवणूक आदी कार्यक्रम पार पडले. त्यामध्ये महात्मा फुले विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे लेझीम व झांज पथक मुख्य आर्कषण होते. दुपारी १२ वाजता नामकरण सोहळा विधी व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.



यावेळी बोलताना  निसर्गोपचार तज्ञ श्री. तोडकर म्हणाले, आपल्या शरीरात काहीही खालल्यास पचवण्याची ताकद असली पाहिजे. मेंदू हा शरीराचा मालक आहे. तो आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवत असतो. त्यामुळे आपण हिमतीने जगणे महत्त्वाचे आहे. आपले आयुष्य सुंदर बनविण्यासाठी हसणे हा सर्वात महत्त्वाचा व्यायाम आहे. मुलांना शिक्षण आणि संस्कार देणे हेही तिथकेच महत्त्वाचे आहे. आई- वडीलांची माया फार महत्त्वाची असते. त्याची जाणीव ठेवायला मुलांनी शिकले पाहिजे. कोणत्याही आजाराची भिती बाळगू नका. त्याची आठवण काढू नका. कोणताही आजार असू देत  तो अगोदर  आपल्या मेंदूतून बाहेर काढा मग तुम्ही आपोआपच बरे व्हाल. असा कानमंत्र त्यांनी यावेळी दिला.




याप्रसंगी महागावातील राज्यसेवा स्पर्धा परिक्षेत यश संपादन केलेल्या अक्षता कुपटे, पाटील, आदर्श शिक्षक संभाजी पोवार, आजी-माजी सैनिक संघटनेने तालुका स्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कॅप्टन महादेव घुगरे, पांडूरंग चौगुले यांच्यासह ग्रामपंचायत  सदस्य, आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्जुन दिवटे यांनी केले. आभार सुरज आसवले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.