मनसेच्या वतीने गडहिंग्लज आगाराकडे करण्यात आली मागणी
जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आगार व्यवस्थापकांना निवेदन
![]() |
| गडहिंग्लज : आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांना निवेदन देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले. यावेळी उपस्थित प्रभात साबळे यांच्यासह विद्यार्थी वर्ग. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): दुष्काळग्रस्त गडहिंग्लज तालुक्यातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मासिक पास योजनेत सवलत मिळण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गडहिंग्लज आगाराकडे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. दुष्काळ निवारण करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गडहिंग्लज तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी दररोज एसटीच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालय गाठत असतात. एसटीने प्रवास करणारे बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी आणि गरीब कुटुंबातील आहेत. यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. वरील सर्व परिस्थितीचा विचार करता आगाराने शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मासिक प्रवास पासमध्ये सवलत देण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, वैभव माळवी, प्रभात साबळे, केंप्पाना कोरी यांच्या सह्या आहेत.
सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे, मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.

