बेळगावची रिक्षा द्वितीय तर रत्नागिरीची रिक्षा तृतीय
तानाजी देवार्डे यांच्या रिक्षाला 'गडहिंग्लज सुंदरी'चा किताब
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील वस्ताद ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रिक्षा सौंदर्य राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूर येथील राजू शेख यांच्या रिक्षाने प्रथम क्रमांक पटकाविले. बेळगावच्या बाळू देवेकर यांची रिक्षा द्वितीय, रत्नागिरीच्या रवींद्र रहाटे यांच्या रिक्षाने तृतीय क्रमांक पटकावले. कोल्हापूरच्या मनीष दिंडे यांच्या रिक्षाला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. तसेच 'गडहिंग्लज सुंदरी' चा किताब तानाजी देवार्डे यांच्या रिक्षाने मिळविला. या स्पर्धेत रत्नागिरी, बेळगाव, गोकाक, सांगली या भागातून 16 रिक्षा चालकांनी सहभाग घेतला होता.
सर्वसामान्य माणूस नेहमीच रिक्षातून प्रवास करत असतो. आपण रिक्षाकडे फक्त एक प्रवासी वाहन म्हणून पाहतो. रिक्षात बसणाऱ्या प्रवाशांचा प्रवासा हा आनंददायी व सुखद व्हावा यासाठी बहुतांशी हौशी रिक्षा चालक आपली रिक्षा मोठ्या कल्पकतेने सजवताना दिसतात. त्यांच्या या कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी गडहिंग्लजच्या वस्ताद ग्रुपने ही अनोखी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांनी आपल्या रिक्षा कशा ठेवल्या आहेत, किती वर्षांपूर्वीची रिक्षा आहे, प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात, रिक्षात महापुरुषांचे कोणते संदेश दिले आहेत आदी बाबी परीक्षणावेळी तपासण्यात आल्या. त्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्याबरोबरच गडहिंग्लज शहरातील रिक्षा चालकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी शहर मर्यादित "गडहिंग्लज सुंदरी" स्पर्धा देखील पार पडली. स्पर्धेत भाग घेतलेल्या काही रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षात मोबाईल, एसी, कुलर, फ्रिज, लॅपटॉप, हेल्थ किट या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याबरोबरच आकर्षक पद्धतीने रिक्षा सजविण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत पंच म्हणून प्रकाश रावळ, सचिन हरळीकर, हरीश पोवार, सचिन चव्हाण, सुरज गवळी यांनी काम पाहिले. स्पर्धेचे उत्कृष्ट संयोजन अजितदादा पाटील, तुकाराम गवळी, सुशांत पोवार, अमोल मगदूम, अक्षय मगदूम, अमर रावळ, अमोल बिलावर, गणेश हजारे, अजित करमरे, बसवराज डोनेवाडी, विनायक डोनेवाडी यांनी केले.
सांगलीच्या रिक्षाचालकाने जिंकली सर्वांची मने
सांगलीच्या एका रिक्षा चालकाने बहारदार स्टंट दाखवत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. ताशी 50 किलोमीटर वेगाने पुढचे चाक उचलून रिक्षा चालवणे, दोन चाकांवर रिक्षा चालवणे अशा प्रकारचे विविध स्टंट त्यांनी दाखवून प्रेक्षकांकडून वाहवाह मिळविली. सर्वांच्या काळजात धडकी भरेल असे केलेल्या या स्टंटबद्दल त्या रिक्षाचालकाचे नागरिकातून कौतुक होताना दिसत होते.






