शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी वेधले लक्ष
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना दिले निवेदन
कोल्हापूर : कोरोना महामारीच्या काळात कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभागाकडे कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या परिचारिका व सफाई कामगारांना शासनाकडून अद्याप मानधन अदा करण्यात आलेली नाही. सदर थकीत मानधन तातडीने मिळण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष )जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात राज्य शासनाने आरोग्य विभागाकडे परिचारिका व सफाई कामगारांची कंत्राटी पध्दतीने नेमणुका केल्या होत्या. त्यासाठी १७ हजार रूपये मानधन निश्चित केले होते. कोविड काळातील परिस्थिती अत्यंत गंभीर होती. जीव धोक्यात घालून या कर्मचाऱ्यांनी त्या काळात काम केले आहे. या कामासाठी शासनाने ठरवून दिलेले मानधन त्यांना तातडीने देणे आवश्यक होते परंतु या महत्त्वाच्या प्रश्नाकडे शासन संवेदनशीलतेने पाहत नाही, ही गोष्ट संतापजनक म्हणावी लागेल.
कंत्राटी कामगारांनी याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. परंतू अद्यापही त्यांना दाद मिळालेली नाही. मध्यंतरी वैद्यकिय शिक्षण मंत्री व पालकमंत्री यांच्याकडे निवेदन देवून त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. या प्रश्नासाठी शासन स्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करण्यात यावा व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला याबाबत निर्देश देवून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दिर्घकाळ थकलेले मानधन तातडीने मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत अशी मागणी या निवेदनातून प्रा. शिंत्रे यांनी केली आहे.

