मिरवणुकीने पालखी डोंगराकडे रवाना
उद्या यात्रेचा मुख्य दिवस
मनसेकडून भाविकांसाठी देण्यात येणार मोफत प्रवास सेवा
छायाचित्रे : मज्जिद किल्लेदार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): 'भैरीच्या नावानं चांगभलं'च्या गजरात व गुलालाच्या उधळणीत सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरव देवाचा पालखी सोहळा सायंकाळी भक्तांच्या अलोट गर्दीत पार पडला. मिरवणुकीने पालखी डोंगरावरील मंदिराकडे रवाना झाली. उद्या (सोमवार) यात्रेचा मुख्य दिवस आहे.
गडहिंग्लज शहरातील शिवाजी चौकातील मंदिरात पुजारी, प्रशासकीय अधिकारी व मानकरी व भाविकांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. पालखी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती.
या मिरवणुकीत मानाच्या सासनकाठ्या सहभागी झाल्या होत्या. पालखी मार्गावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. पालखी समोरील सासनकाठ्याना गोंडे बांधण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या मिरवणुकीत मोठे गोंडे आकर्षणाचा विषय ठरले. महिला व ज्येष्ठ नागरिकांना पालखीचे सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले होते.
शिवाजी चौकातून पालखी नेहरू चौक, बाजारपेठ, वीरशैव चौकातून काळभैरी रोडवरून डोंगरावरील मंदिराकडे रवाना झाली. रात्री बारा वाजता श्री काळभैरव देवाची शासकीय पूजा होणार आहे. पहाटे काकड आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
उद्या यात्रेचा मुख्य दिवस
उद्या (सोमवार) यात्रेचा मुख्य दिवस आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या भागातून लाखो भाविक गर्दी करतात. सर्व भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी प्रशासनाने योग्य पद्धतीने नियोजन केले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. यात्रास्थळी जाण्यासाठी गडहिंग्लज आगाराने स्वतंत्र ठिकाणी जादा बस गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. यात्रास्थळी देखील तात्पुरते बस स्थानक उभे करण्यात आले आहे. सध्या शहरात महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी लक्षात घेऊन त्या दृष्टीने वाहतुकीचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, मुख्याधिकारी संजय गायकवाड, गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन केले आहे.
मनसेकडून भाविकांसाठी मोफत प्रवास सेवा
यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोफत प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी दिली.








