Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मना-मनात रुंजी घालणारा गझलचा आवाज शांत

ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे निधन 


 



मुंबई : चिठ्ठी आयी है..चिठ्ठी आयी…” या सदाबहार गझलच्या माध्यमातून रसिकांच्या मनांचा ठाव घेणारे प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे आज वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले. गेले अनेक दिवस ते आजारी होते. त्यांच्या कुटुंबीयांकडून निधना संदर्भातील जाहीर करण्यात आलेल्या स्टेटमेंटमध्ये ' अत्यंत जड अंतकरणाने आपल्याला कळवताना दुःख होत आहे की, 26 फेब्रुवारी रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचे दुःखद निधन झाले. असे म्हटले आहे. त्यांच्या या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.



तरल भावनांना सुरेल आवाज देणारा आवाज हरपला : मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायक पंकज उधास यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गझलांमधील तरल भावनांना सुरेल आवाज देणारा हा कलावंत तितकाच विनम्र होता. त्यांच्या जाण्यामुळे भारतीय गझल गायकीला घरा-घरात आणि मना-मनात पोहचवणारा आवाज शांत झाला आहे. ते स्वररुपात अजरामर राहतील. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्र एका ज्येष्ठ मार्गदर्शकालाही मुकले आहे, असे शोकसंदेशात मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.



रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली



ज्येष्ठ गायक पंकज उधास यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. हृदयात थेट पोहचणारी अशी त्यांची गायकी होती, त्यांच्या निधनाने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात,  पंकज उधास यांनी अनेक चित्रपटांसाठी विविध प्रकारची गाणी गायली. त्यांनी गायिलेल्या गजलांनी तीन पिढ्यांच्या हृदयावर राज्य केले. आजही ‘चिठ्ठी आयी है’ हे गाणं लागतं तेव्हा मन कातर होतं. त्यांची गाण्याची वेगळी शैली होती. मैफीलीत त्यांचे गाणे अधिक खुलून यायचे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी असून कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याचे बळ देवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.